श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर तलावामध्ये शुक्रवारी सापडलेले मानवी सांगाडे अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते मुंबई येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तलावातील त्या खड्डय़ात आणखी बरेच सांगाडे असावेत असा अंदाज आहे. ते सर्व बाहेर काढण्यात येतील अशी माहिती पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावरच या मानवी सांगाडय़ांचे गूढ उलगडेल असे ते म्हणाले.
तालुक्यातील विसापूर हा जुना व मोठा तलाव आहे. या तलावातील माती शेतकरी जेसीबीच्या साहय्याने काढतात. याच खोदाईत शुक्रवारी १२ फूट खोल खड्डय़ात सहा मानवी सांगाडे सापडले. खोदकाम करणाऱ्या भिल्ल समजाच्या मजुरांनी मातीमधून हे सांगाडे वेगळे केले. मात्र याच खड्डय़ात मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही मानवी सांगाडे असल्याचे दिसते.
विसापूर तलावाजवळच खुले कारागृह आहे. त्याअनुषंगानेही विविध तर्क-कुतर्क व्यक्त होत आहेत. एकाच जागेवर इतके सांगाडे कसे, याचा उलगडा झालेला नाही. मानवी हाडे, दातासहीत बचळी, असे अवयवही शाबूत आहेत. त्यामुळे हे सांगाडे फार जुने नसावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो. या सगळ्या गोष्टींचे गूढ न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तपासणीनंतरच उलगडेल, असे पोलिसांनी सांगितले.  मात्र तालुक्यात या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू असून सांगाडय़ांच्या अनुषंगाने विविध अफवाही पसरल्या आहेत.