एव्हरेस्ट मोहिमेवर जाणाऱ्या गिर्यारोहकांनी पाण्याच्या बॉटल्स, खाद्यपदार्थ आदी वस्तू त्याच ठिकाणी टाकल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा नेपाळमधील शेर्पांनी केला आहे. अन्न व तत्सम पदार्थ या मोहिमेदरम्यान जवळ बाळगल्या जातात. उरलेल्या आणि खराब झालेल्या वस्तू वाटेतच टाकण्यात आल्यामुळे त्या सडून त्याचा विशिष्ट प्रकारचा गंध पसरतो आणि वातावरण प्रदूषित होत असल्याचे नेपाळ गिर्यारोहण संघटनेचे प्रमुख अंग त्शेरिंग शेर्पा यांनी सांगितले.
हिमालयाचे शिखर सर करणे, हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न आहे. जगातील सर्वात उंच, अशी नोंद असलेल्या एव्हरेस्टच्या या मोहिमेत प्रत्येकजण यशस्वी होतोच, असे नाही. हजारो गिर्यारोहक एव्हरेस्ट गाठण्यासाठी गर्दी करतात, पण या स्वप्नपूर्तीच्या नादात आपण या ठिकाणी प्रदूषण पसरवत आहो, याचे भान त्यांना नाही. ऑक्सिजनच्या बॉटल्स, फाटलेले तंबू, तुटलेल्या दोऱ्या, कॅन्स, रॅपर्स एवढेच नव्हे, तर मानवी विष्टेमुळे हा पर्वत हळूहळू खराब होत चालल्याची खंत शेर्पांनी व्यक्त केली. शौचालये नसल्यामुळे बर्फातच खड्डे खणून तात्पुरती शौचालये तयार केली जातात. मात्र, मातीत मानवी घाण मिसळून जाते, पण बर्फात ती तशीच राहात असल्याचे भान गिर्यारोहकांना नाही. जेव्हा बर्फ वितळतो, तेव्हा वितळलेल्या बर्फाच्या पाण्यासोबत ती सर्वत्र पसरते. एवढेच नव्हे, तर मानवी कचरासुद्धा हिमनद्यांमध्ये मिसळला जातो आणि तेच पाणी स्थानिक लोक पीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हिमालयतज्ज्ञ मिशेल जान चान यांच्या मते गिर्यारोहकांचा स्वच्छतेचा दर्जा इतका खालावलेला असू शकतो, याचे आश्चर्य वाटते. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस गिर्यारोहक या एव्हरेस्टचे सौंदर्यच संपवून टाकतील.
गिर्यारोहकांनी त्यांच्याजवळ जमा होणारा कचरा तेथेच न टाकता कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. जेव्हा एव्हरेस्टपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग आहे तेव्हा कुठेतरी खालपर्यंत कचरा पोहोचवण्याकरिता एक मार्ग तयार करता येऊ शकतो. ज्याला हिमालयाविषयी खरोखरच आस्था आहे तो असा कचरा करणार नाही, पण जर तुम्ही एका अस्वच्छ शिबिराचे गिर्यारोहक असाल तर तुम्ही हिमालयावर कचरा कराल, असे शेर्पा म्हणाले. हिमालयावर कचरा असाच साठत राहिला तर ही एक गंभीर समस्या असेल, असेही ते म्हणाले. त्यामुळे नेपाळने आता स्वत:च हिमालय स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. तसेच कचरा करणाऱ्या गिर्यारोहकांना गंभीर दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून एक नवीन नियम तयार करण्यात आला आहे.
हिमालयावरील कोणत्याही मोहिमेकरिता आधी ४ हजार डॉलर्स जमा करावे लागतील. जे पर्वतारोही हिमालयावर कचरा न करता परत आणतील त्यांना जमा केलेले चार हजार डॉलर्स परत केले जातील आणि जे परत आणणार नाहीत त्यांना ते परत मिळणार नाही.
हिमालय स्वच्छ ठेवणे ही गिर्यारोहक, मार्गदर्शक आणि अधिकारी अशा प्रत्येकाचीच जबाबदारी आणि कर्तव्य आहे. वार्षिक पर्वतारोहण ऋतु मार्चमध्ये सुरू होतो आणि मे मध्ये संपतो. यात सुमारे ३०० पर्वतारोहक आणि शेर्पा सहभागी असतात. गेल्या वर्षी या मोहिमेत सुमारे १६ स्थानिक मार्गदर्शकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे मोहीम थांबवण्यात आली. २००८ पासून दावा स्टेवन शेर्पा यांच्या नेतृत्त्वाखाली वार्षिक एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. यात सुमारे १५ हजार किलो कचरा गोळा करण्यात आला. अजून किती कचरा मागे राहिला असेल, याचा अंदाज नाही. २०१२ मध्ये सुमारे १.५ मेट्रिक टन कचरा एव्हरेस्टवरून गोळा करण्यात आला.