अचानक वीज कोसळावी तसा एखादा आघात होतो आणि आयुष्यातला सारा आनंदरूपी प्रकाश वेदनांच्या काळय़ामिट्ट अंधारात हरवून जातो. घरातील आनंदच संपल्यानंतर बाकी कुटुंबीयांनी कोणत्या आशेने जगायचे आणि इतरांनीही त्यांना जगण्याची उभारी कशी द्यायची, असे मूक द्वंद्व सुतकी शांततेच्या रूपात सुरू होतं. पण जगण्यातलं भीषण वास्तव संपता संपत नाही. आपल्या तीन कोवळय़ा मुलींवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि  हत्येच्या आघाताने हादरून गेलेल्या मुरमाडीतील माधुरी बोरकर आज याच वास्तवाला सामोऱ्या जात आहेत. या क्रूर हत्याकांडाचे पडसाद मानवाधिकार आयोगापासून थेट दिल्लीपर्यंत उमटले असले तरी पीडित मुलींच्या आईला   सर्वाधिक भेडसावतोय उद्याचा प्रश्न. येणारा दिवस कसा ढकलायचा एवढय़ाच एका प्रश्नाचे उत्तर या मुलींची विधवा आई शोधत आहे. केंद्र आणि राज्यातर्फे जाहीर झालेली सरकारी मदत अद्याप त्यांना मिळालेली नाही. पण ‘पैशाची मदत नको त्यापेक्षा क्रूरकर्मा आरोपींना पकडून फाशी द्या’, असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत.
भंडाऱ्यापासून लाखनी मार्गावर जेमतेम २० किलोमीटरवर असलेल्या आठ हजार लोकवस्तीच्या मुरमाडी गावात राहणाऱ्या  माधुरी बोरकर यांच्या तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांना विहिरीत फेकून देण्यात आले. पोलीस तपासातील अक्षम्य दिरंगाईने तीन लहानग्यांचे जीव गेले. घटना घडल्यानंतर  मानवाधिकार आयोग आणि बालहक्क आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संसदेत लोकसभाध्यक्ष मीरा कुमार आणि अन्य सदस्यांनी या घटनेबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री आर.आर. पाटील यांना थेट मुरमाडीत धाडले. मुलींच्या आठवणीने रडून रडून थकलेल्या माधुरी बोरकरांच्या संवेदनाच हरवल्या असल्या तरी आता त्यांनी मन खंबीर केले आहे. भेटायला येणारे नेते, पत्रकारांचे ताफे आणि मंत्र्यांच्या लाल दिव्यांच्या गाडय़ांनी एरवी कुणाच्या खिजगणतीतही नसलेले मुरमाडी आता एक ‘न्यूज र्पिोटिंग’चे संवेदनशील केंद्र झाले आहे. गाव लहान पण कौटुंबिक जिव्हाळ्यात जगणारे असल्याने सारा गाव माधुरी बोरकरांच्या पाठिशी उभा आहे. संपूर्ण गाव दहशतीत जगत असताना आरोपी अद्यापही मोकाट आहेत.  लाखनीपासून गावात जाण्यासाठी धड रस्तादेखील नाही. छोटय़ाशा घरात माधुरी बोरकर तीन मुली आणि सासू-सासऱ्यांसह राहतात. त्यांनी मुलींच्या हत्याकांडासाठी सासू सत्यशीला बोरकर यांच्यावरच आरोप केल्याने कुटुंबातच तणाव निर्माण झाला आहे. विधवा असलेल्या माधुरी बोरकरांचा सासरी प्रचंड छळ होत होता. कौटुंबिक वादात माधुरीची आई रेखा भेंगार आणि मामा  मुलींचे मामा अरुण गोतमारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यापर्यंत साथ दिली. यातूनही नवी गुंतागुंत निर्माण झाली आहे. माधुरी बोरकरांच्या माहेरची माणसे खंबीरपणे त्यांना आधार देत असली तरी प्रत्येकाला आपले कुटुंब आहे. जगण्याचे वास्तव मुलींच्या आईपुढे आ वासून उभे असताना पत्रकार आणि भेटायला येणाऱ्यांच्या प्रश्नांची भर पडत आहे. भाजपाध्यक्ष नितीन गडकरीही तेथे पोहोचले तेव्हा माधुरी बोरकर कशाबशा त्यांच्याशी बोलल्या. त्यांच्या अंगात त्राणच नव्हते. नवरा हृदयविकाच्या झटक्याने गेल्याने विधवेचे जगणे नशिबी आलेले. आता  मुली गेल्याच्या दु:खात त्या आकंठ बुडाल्या आहेत. सरकारी मदत त्यांच्या हातात पडेलही पण, गेलेले जीव परत आणू शकणार नाही हेच त्यांच्या जीवनाचे वास्तव आहे..