नेवासे तालुक्यातील भानसहिवरा येथे अंगात देवी येणारी पत्नी व संबंधित भोंदू बाबाविरुद्ध या महिलेच्या पतीनेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हय़ातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी अधीक माहिती अशी, भानसहिवरा येथील फिर्यादी पोपट पांडुरंग कोकाटे याची पत्नी संगीता ही अनिल अशोक चौधरी या भोंदूबाबाच्या संपर्कात आली. संगीता कोकाटे हिच्या अंगात मळगंगा देवी येते अशी अफवा पसरवून दि. ४ ते १८ डिसेंबर २०१२ या काळात संगीता निद्रिस्त अवस्थेत राहणार असून चंपाषष्टीच्या दिवशी दि. १८ डिसेंबरला ती उठेल व ज्या ठिकाणी परत बेशुद्ध पडेल त्या ठिकाणी मळगंगा देवी प्रगट होईल अशी अफवा पसरवली. त्यानुसार दि. १८ डिसेंबरला घराजवळच आधीच पुरून ठेवलेली घागर, तांदळा आणि गणपतीची मूर्ती बाहेर काढण्यात आली. तसेच या ठिकाणी गावाला पाणी पुरेल एवढे पाणी लागेल असेही त्याने जाहीर केले होते. त्यामुळे गावातून दि. १८ डिसेंबरला महिलेची व देवीची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती.
अलीकडेच ही महिला परत ७ दिवस गावातून गायब झाली होती. ती निघोजच्या यात्रेच्या दिवशी कुंडामधून बाहेर येण्याची अफवाही अनिल चौधरी याने पसरवली होती. मात्र पती पोपट कोकाटे याला अनिलबद्दल संशय आल्याने त्याने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तपास करून अनिल यास ताब्यात घेताच सदरची महिला रत्नागिरी येथून शोधून काढण्यात आली. या प्रकाराची नेवासा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर चर्चा झाली. अखेर आपल्या पत्नीचे व अनिलचे कारनामे समजल्यावर पती पोपट यानेच त्यांच्याविरुद्ध अधंश्रद्धा पसरवण्याचे गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्हीही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे हे करीत आहेत.
ज्या वेळी १८ डिसेंबरला हाताने पुरलेली देवी सापडली होती, त्या वेळी अनेकांनी चमत्काराला नमस्कार केला होता, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. मच्छिंद्र वाघ यांनी मात्र सदरचा चमत्कार पुन्हा करून दाखवा असे आव्हान अनिल चौधरी याला दिले होते, त्यासाठी बक्षीसही जाहीर केले होते, पण समितीचे आव्हान भोंदूबाबा अनिल याने स्वीकारले नव्हते.