दुसरा विवाह करूनही पहिल्या पत्नीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने दुःखावेगात एका पतीने आपल्या सात वर्षांच्या मुलासह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे हा प्रकार घडला. नागनाथ दादाराव सावंत -घरबुडे (वय ३५) व अजिंक्य( वय ७ ) अशी आत्महत्या केलेल्या दोघा बापलेकांची नावे आहेत़. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे मृत नागनाथ सावंत हा राहात होता.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागनाथ सावंत याच्या पत्नीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर घरातील मंडळी व नातेवाईकांच्या सांगण्यावरून नागनाथ याने दुसरा विवाह केला होता. दुसरी पत्नी घरात नांदू लागली तरी नागनाथ हा त्यात रममाण झाला नव्हता. त्याला पहिल्या पत्नीच्या आठवणी सतावत होत्या. कारण पहिल्या पत्नीचे प्रेम तो विसरू शकत नव्हता. त्या नैराश्यातूनच नागनाथ याने आपला मुलगा अजिंक्य याच्यासह आत्महत्या करण्याची तयारी केली.

गुढी पाडव्यादिवशी घरातील धार्मिक विधी उरकून नागनाथ हा वडवळ येथे नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतो म्हणून मुलगा अजिंक्यला सोबत घेऊन घरातून बाहेर पडला. वडावळ येथे त्याने नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलेही. परंतु नंतर तो जवळच असलेल्या रेल्वेरूळावर गेला. तेथे सोलापूर-पुणे दरम्यान धावणा-या एका रेल्वे गाडीखाली नागनाथ याने मुलासह झोकून दिले आत्महत्या करते वेळी वडिलांनी लहान मुलास घट्ट असे पकडले असल्याचे छिन्नविच्छिन्न झालेल्या दोघांचेही मृतदेह पहिल्यानंतर दिसत होते़. मोहोळपोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.