कराडमध्ये माझे घर असल्यामुळे तिथूनच आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या कार्यक्रमासाठी चव्हाण औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी निवडक पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले. गेले काही दिवस चव्हाण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधताहेत, ही चर्चा चुकीची आहे. कराडमध्ये माझे घर असल्यामुळे मी तिथूनच निवडणूक लढविणार आहे. दुसरा कोणताही मतदारसंघ शोधण्याचा प्रश्नच येत नाही. केंद्रीय समितीला मी याबद्दल कळविले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांत मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ते याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
जातीयवादी पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणूक लढविली पाहिजे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू असून, येत्या २-३ दिवसांत आघाडी होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा द्यायची, कोणत्या मतदारसंघातून कोणी निवडणूक लढवायची आणि कुठल्या जागांची अदलाबदल करायची, यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेश कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका केंद्रीय छाननी समितीकडे पोहोचविली आहे, असे चव्हाण म्हणाले.