राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी त्यांच्या भाजपमधील प्रवेशासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. त्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील ताकद वाढविण्याच्यादृष्टीने उदयनराजे भोसले यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचेही सांगितले जात होते. याचदरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी उदयनराजे भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच होईल, असे विधान केले होते. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. आदरणीय असलेल्या उदयनराजेंना आम्ही मुजरा करतो. ते जर भाजपमध्ये आले तर आनंदच आहे, असे पाटील यांनी सांगितले. तेव्हापासून उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले होते. मात्र, उदयनराजे यांनी आज एका कार्यक्रमात आपण राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्य़ाात उदयनराजेंचा राष्ट्रवादीशी असलेला सवतासुभा जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्याबद्दल पवार काय बोलणार याकडे सगळय़ांचे लक्ष होते. पवारांनी शेंद्रे येथील कार्यक्रमात उदयनराजे यांच्याबद्दल थेटपणे बोलणे टाळले. परंतु, पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले होते. शरद पवार यांनी उदयनराजे आणि ते स्थापन करत असलेल्या आघाडीसंदर्भात एकही शब्द उच्चारला नाही, मात्र यावेळी रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सडकून टीका करत त्यांच्या दहशतीला आम्ही घाबरत नसल्याचे सांगितले होते.