केंद्राच्या आदर्श गाव योजनेसाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील आडगावची निवड केली. मात्र, दुसरे खासदार राजकुमार धुत यांनी निवड केलेल्या वेरूळ गावासाठी विशेष बाब म्हणून परवानगी मागावी लागणार आहे. मराठवाडय़ातील खासदारांना गाव निवडीत लोकसंख्येचा निकष अडसर ठरू लागल्याने गावांची निवड प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावाची निवडही अजून होणे बाकी आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सुचविल्याप्रमाणे खासदारांनी आदर्शग्राम उभारण्यास गाव निवडताना लोकसंख्येचा निकष अडसर ठरू लागला आहे. ज्या गावात खासदारांचे अधिक समर्थक आहेत, तेथील लोकसंख्या अधिक असल्याने काही खासदारांना गाव निवड करता आली नाही, तर काहींना गाव निवडीसाठी विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे.
जिल्ह्यातील दोन खासदारांपकी धुत यांनी आदर्शगाव विकासासाठी जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या वेरुळला पसंती दिली. मात्र, गावची लोकसंख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. गाव मोठे असले, तरी तेथील विकासास धुत यांच्याकडून अधिक सहकार्य मिळू शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषात सवलत देण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी काही गावांची चाचपणी केली. मात्र, निवडलेली गावे अधिक लोकसंख्येची असल्याने ते पुन्हा नव्या गावाच्या शोधात आहेत. िहगोलीचे खासदार राजीव सातव यांचा मतदारसंघ तीन जिल्ह्यांत विभागला आहे. काही गावे नांदेड, तर काही गावे यवतमाळची असल्याने तीन गावे निवडायची कोणती, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. या अनुषंगाने नुकतीच बठक घेण्यात आली. कोणते गाव विकसित करणार हे लवकरच सांगू, असे त्यांनी प्रशासनास कळविले.
लोकसभेची पोटनिवडणूक नुकतीच झाली असल्याने बीडमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली नाही. लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनीही अजून त्यांचे गाव निवडले नाही. मानव विकासाच्या योजना राबविण्यासाठी खासदारांना स्वत: लक्ष घालावे लागणार आहे. मात्र, गाव निवडीचा घोळ लोकसंख्येत अडकला आहे.