भाजपाने १९९७ च्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडल्याचे सांगून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मते मागून केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. मात्र, सत्तेत येताच भाजपची विदर्भाबाबतची भाषा बदलली आहे. आता हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून विदर्भ राज्य जनआंदोलन समितीच्या नेत्यांनी ३० एप्रिलपर्यंत स्वतंत्र विदर्भाची घोषणा झाली नाही, तर १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचे पुतळे जाळू, असा कडक इशारा दिला.
विदर्भ राज्य जनआंदोलन समितीच्या वतीने सिंदेखेडराजा येथून निघालेल्या विदर्भ गर्जना यात्रेचा गडचिरोलीत मंगळवारी समारोप झाला. यावेळी इंदिरा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत नेत्यांनी हा इशारा दिला. माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, प्रबिरकुमार चक्रवती, अ‍ॅड.नंदा पराते, डॉ.रमेश गजबे, सरोज काशीकर, मधुकर कुकडे, रंजना मामर्डे, दिलीप नरवडिया, धर्मराव रेवतकर, धनंजय धार्मिक, अरविंद भोसले, अरुण मुनघाटे, प्रभू राजगडकर यांच्यासह अनेक विदर्भवादी नेते या वेळी उपस्थित होते.
अ‍ॅड. चटप म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रावर ३ लाख ४४ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून यंदाचे बजेट ४० टक्क्यांनी कपात असणारे आहे. विदर्भात अजूनही २ लाख २७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष आहे. नोकरभरती ठप्प आहे. अशा परिस्थितीत सरकार पथकर आणि एलबीटी मुक्तीच्या घोषणा करत आहेत. चंद्रपूरला दारूबंदी केल्यानंतर महसुली उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे असताना सरकार कुठल्याही हालचाली करताना दिसत नाही. परिणामी, येणाऱ्या काळात हे राज्य दिवाळखोर राज्य म्हणून ओळखले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाजप आज केंद्र व राज्यात सत्तेवर आहे. या पक्षाने भुवनेश्वरच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव मंजूर केला होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही तसेच आश्वासन देऊन मते मागितली आणि सत्ता मिळवली, परंतु आता त्यांची भाषा बदलली. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी तीव्र करावी लागत आहे, असे सांगून अ‍ॅड. चटप यांनी ३० एप्रिलपर्यंत पावले न उचलल्यास १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचे पुतळे जाळू, असा कडक इशारा दिला. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन रमेश भुरसे यांनी केले.