जिल्हा रुग्णालयात ५ दिवसांपूर्वी सोलापूरहून आलेल्या कुमारी मातेचा गर्भपात करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कुमारी माता वेडसर असून, पोटातच गर्भाचा मृत्यू झाल्याने गर्भपात करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. गर्भपात कायद्याला धरून झाला असेल, तर रुग्णालयातर्फे याचा तपशील स्पष्टपणे प्रशासनाला का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अहवाल मागितला असून, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (१ मे) सोलापूर जिल्ह्यातील २१वर्षीय तरुणी भरती झाली. त्याच दिवशी या तरुणीचा २६ आठवडय़ांचा गर्भ बाहेर काढण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे सोलापूरचे असल्याने या तरुणीला सोलापूरहून येथे दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर ही तरुणी वेडसर असून पोटातच गर्भाचा मृत्यू झाल्याने गर्भपात करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला. मात्र, गर्भपात करण्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यात आली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या तरुणीवर अत्याचार कोणी केला, याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे का? सोलापूरहून बीड जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी का आणले? याबाबत स्पष्टीकरण होत नाही. या प्रकरणी पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला. त्यानंतर याबाबतची कार्यवाही होईल. धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा रुग्णालयात बेकायदा गर्भपात होण्याचे प्रकरण गंभीर असून, तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.