म्हैसाळ गर्भपात प्रकरण

म्हैसाळ गर्भपात प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने गुरुवारी वादग्रस्त डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलची पाहणी केली. शासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची पहिली बठक आज झाली. पुढील बठक ११ एप्रिल रोजी होणार आहे.

अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्काळ नियुक्त करण्यात आलेली समिती बरखास्त करून शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नियुक्त केली असून या समितीची पहिली बठक आज मिरजेत झाली. या समितीमध्ये न्याय वैद्यक विभाग प्रमुख, महसूल प्रतिनिधी म्हणून संजयसिंह चव्हाण, पोलीस प्रतिनिधी म्हणून उप अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांचा समावेश असून समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे हे काम पाहणार आहेत.

म्हैसाळ गर्भपात प्रकरणामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला काय? असे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? बेकायदा गर्भिलग परीक्षण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना काय असाव्यात, या पातळीवर ही समिती आपला अहवाल तयार करणार असून या समितीने चौकशी करून एक महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशी समितीची पहिली बठक गुरुवारी मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयात पार पडली. बठकीनंतर समिती सदस्यांनी म्हैसाळ येथे जाउन खिद्रापुरे यांच्या रुग्णालयाची पाहणी केली. याचबरोबर १९ अर्भकांचे मृतावशेष पुरलेल्या ठिकाणाची माहितीही समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतली. या समितीची दुसरी बठक ११ एप्रिल रोजी बोलावण्यात आली असून या वेळी पुढील चर्चा होणार असल्याचे अध्यक्षा श्रीमती डॉ. सापळे यांनी सांगितले.