२१ दांपत्यांचे रक्त डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले

म्हैसाळ गर्भपातप्रकरणी भ्रूणांच्या माता-पित्यांचा शोध घेण्यासाठी २१ दांपत्यांचे रक्त डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून यामध्ये जर संबंध निष्पन्न झाले तर गर्भपातास प्रवृत्त करणाऱ्याचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची तयारी आहे. १९ भ्रूणांपकी ८ भ्रूणांचा डीएनए चाचणी अहवाल तपास यंत्रणेच्या हाती आला असून यापकी ३ भ्रूण मुलांचे आणि ५ भ्रूण मुलींचे होते हे स्पष्ट झाले असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात राज्याला हादरवून सोडणारे म्हैसाळचे अवैध गर्भपात केंद्र उघडकीस आले. क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने पशाच्या मोहातून गर्भातच हत्याकांड केलेल्या १९ भ्रूणांचे मृतावशेष ओढा पात्रात मिळाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले.

या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी खिद्रापुरे याच्यासह दोन डॉक्टर, परिचारिका, औषध विक्रेता, एजंट अशा १३ जणांवर अटकेची कारवाई केली आहे.

ओढा पात्रात प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडलेल्या १९ भ्रूणांचे मृतावशेष डीएनए चाचणीसाठी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते. यापकी ८ भ्रूणांचे अवशेष तपासणी योग्य आढळून आले असून अन्य अवशेष कुजले असल्याने त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र आठ भ्रूणांचा डीएनए अहवाल तपास पथकाकडे आला असून यापकी ५ स्त्रीिलगी व ३ पुरूषिलगी भ्रूण असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे हे गर्भिलग निदान पशाच्या आमिषाने चुकीचे केले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधीक्षक िशदे यांनी सांगितले.

या भ्रूणांच्या माता-पित्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून याप्रकरणी आतापर्यंत २१ दांपत्यांच्या रक्तांचे नमुने डीएनएसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त होताच मृत भ्रूणांच्या माता-पित्यांचा शोध लागण्यास मदत होणार असून या प्रकरणी महिलेला गर्भपातास कोणी प्रवृत्त केले याचा शोध घेऊन त्याच्याविरुध्द कारवाई करण्याची पोलिसांची तयारी आहे.