जयकुमार रावल यांच्या आदेशास पोलीस अधीक्षकांकडून केराची टोपली

जिल्ह्य़ात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरूध्द तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना दिले आहेत. ‘लोकसत्ता’ने जिल्ह्य़ातील अवैध धंद्यांकडे पोलिसांकडून होणाऱ्या दुर्लक्षावर प्रकाशझोत टाकल्यावर मंत्री जयकुमार रावल यांनी पोलीस अधीक्षकांची चांगलीच झाडाझडती घेतली. तत्काळ कारवाईचे आदेश दिले असतांनाही दुसरीकडे जिल्ह्य़ात अवैध व्यवसाय तेजीतच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्य़ात भर रस्त्यांवर खुलेआम पद्धतीने सुरु असलेल्या अवैध व्यवसायाबाबत ‘लोकसत्ता’ ने आवाज उठविल्यावर त्याची दखल जिल्ह्य़ाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसत्तामधील बातमीचा उल्लेख करीत बैठकीत उपस्थित असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक्र डहाळे यांना तत्काळ जिल्ह्य़ातील अवैध धंद्यांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू होते. जिल्ह्य़ातील शहादा, नंदुरबार शहरात रस्त्यांवर थाटण्यात आलेल्या अवैध व्यवसायांवर कोणताही परिणाम झाला नाही. पालकमंत्र्याच्या आदेशाला अधीक्षकांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे पोलीस दलातील काही अधिकारीच खासगीत धंदे सुरू ठेवण्यास सांगत असल्याचा दावा अवैध व्यवसायिकांकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. जर अशाच पद्धतीने जिल्हा अधीक्षकांकडून अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू राहिले तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पुराव्यासह गाऱ्हाणे मांडावे लागणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.