स्त्रीभ्रूण हत्या व महिलांवरील पाशवी अत्याचाराची प्रकरणे देशभर गाजत असतांना अवैध गर्भपाताशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण बुलढाण्यात उघडकीस आले आहे. येथील शमा नर्सिग होमचे संचालक डॉ. सय्यद आबिद हुसेन व डॉ. यास्मीन हुसेन या दांम्पत्याला औरंगाबादच्या आरोग्य खात्याच्या स्त्रीभ्रूण हत्या व अवैध गर्भपात प्रतिबंधक विशेष दक्षता पथकाने पूर्वनियोजित सापळा रचून पंधरा हजार रुपये घेतांना रंगेहाथ पकडले. या डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात बुलढाणा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले, पण या पथकाच्या निष्काळजीपणामुळे आरोपी फरार झाले आहेत.
यासंदर्भात विशेष दक्षता पथकाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत डॉ. सय्यद हुसेन व डॉ. यास्मीन हुसेन यांचे शहरातील पाठक गल्ली परिसरात शमा नर्सिग होम असून तेथे सर्रास अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नर्सिग होममधील जप्त करण्यात आलेल्या रजिस्टरच्या नोंदीवरून या रुग्णालयात १७२ पेक्षा जास्त अवैध गर्भपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गर्भपात केंद्राची अधिकृत परवानगी नसतांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गर्भपाताचा हा कत्तलखाना कसा काय सुरू होता, असा यानिमित्ताने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. औरंगाबादच्या आरोग्य खात्याच्या विशेष दक्षता पथकाकडे येथील शमा नर्सिग होममध्ये अवैध गर्भपात होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. औरंगाबाद येथील डॉ. माधव मुंढे व बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी गजरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका महिला ग्राहकाच्या माध्यमातून या नर्सिग होमवर छापा घालून संचालक डॉ. सय्यद व डॉ. यास्मीन हुसेन यांना अवैध गर्भपातासाठी पंधरा हजार रुपये घेतांना पकडले. त्यानंतर पथकाकडून या डॉक्टर दाम्पत्याची पोलीस ठाण्यात रवानगी न करता चौकशीच्या नावावर त्यांना सूट देण्यात आली. ३ जानेवारीला छापा घातल्यानंतर या प्रकरणाची फिर्याद देणे आवश्यक असताना विशेष दक्षता पथकाने यासंदर्भातील तक्रार ४ जानेवारीला दिली. या अवधीत हे दाम्पत्य फरार झाले. शमा नर्सिग होममध्ये कित्येक वर्षांंपासून अवैध गर्भपात केले जात आहेत. शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी गजरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गेले वर्षभर स्त्री रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्रांची कसून तपासणी केल्यावरही यातून शमा नर्सिग होम कसे काय सुटले, हा प्रश्न अनुत्तरित आहे.