गर्भवतीला स्त्रीरोग डॉक्टरकडून न तपासता स्वत: तपासल्याचा राग येऊन पुरुष डॉक्टरला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संतोषीमाता चौकात डॉ. नितीन कुलकर्णी यांचा खासगी दवाखाना आहे. डॉ. कुलकर्णी यांनी गरताड येथील अरुण पाटील (२५) यांच्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेची तपासणी महिला डॉक्टरकडून न करता स्वत: केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी डॉ. कुलकर्णी यांना मारहाण व शिवीगाळ केली. या प्रकरणी डॉ. कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवीत त्यास अटक केली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. मीना वानखेडकर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनुराधा जोशी, सचिव डॉ. जया दिघे यांनी केले. मोर्चेकऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.