पनवेलमधील कपल बार आणि डिंपल बारमधील कारवाईनतंर नवी मुंबई पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रकरणात दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई सुरू झाली असली तरी उत्पादन शुक्ल विभागाचे अधिकारी मात्र मोकाटच आहेत. लेडीज सव्‍‌र्हिस बारचे लायसन्स देणाऱ्या रायगडच्या उत्पादन शुक्ल विभागावर कारवाई कधी होणार, असा सवाल विचारला जातोय.
पनवेल येथील कपल बार आणि डिंपल लॉजवर केलेल्या कारवाईत ८९ बारबाला आणि ४३ वेटरांना ताब्यात घेण्यात आले. यातील ४० बारबाला अल्पवयीन असल्याची बाब समोर आली, तर कारवाईत एक कोटीहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली. मात्र याच पनवेल परिसरात अजूनही ११ लेडीज सव्‍‌र्हिस बार बिनबोभाट सुरूआहे. तर खालापूर हद्दीत ३ लेडीज सव्‍‌र्हिस बार सुरूआहेत. यांच्यावर कारवाई कधी होणार आणि ती कारवाई कुठले पोलीस करणार, असा सवाल विचारला जातो आहे.
लेडीज सव्‍‌र्हिस बारच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा धंदाच सध्या या बारचालकांकडून सुरू असल्याचे समोर येत आहे. यासाठी प्रत्येक लेडीज सव्‍‌र्हिस बारला लागून एका लॉजची उभारणी करण्यात आली आहे. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने या अनैतिक धंद्यासाठी पनवेल आता हब बनले आहे. या जिल्ह्य़ांमधून येणाऱ्या हजारो आंबटशौकिनांकडून अल्पवयीन आणि तरुण मुलींचे शोषण केले जात आहे.  रायगडचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि नवी मुंबई व रायगड पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या कृपादृष्टीने हा अनैतिक धंदा बिनबोभाट सुरू आहे. पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानंतर ठाण्याच्या ग्रामीण पोलीसांनी कपल बारवर धाड टाकली आहे. नवी मुंबईच्या काही पोलीस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईलाही सुरुवात झाली आहे. पनवेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवळे यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात आले, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक घडवले यांची बदली करण्यात आली आहे. मात्र लेडीज सव्‍‌र्हिस बारला परवाने देणारे रायगडचे उत्पादन शुल्क अधिकारी मात्र मोकाटच आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगडचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी खालापूरमधील तीन लेडीज सव्‍‌र्हिस बारमध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याने त्यांचे परवाने तातडीने रद्द करा, अशा लेखी सूचना रायगडच्या उत्पादन शुल्क अधीक्षक एस. पी. दरेकर यांना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात केल्या होत्या. आज या लेखी सूचना देऊन सहा महिने लोटले आहेत, मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी कोणतीही कारवाई केली नाही.
रायगडच्या उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. पी. दरेकर या स्वत: महिला आहेत, त्यांना या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण दिसत नाही का? जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षकांनी लेखी पत्रव्यवहार करूनही त्यावर कारवाई करणे दरेकरबाईंचे कर्तव्य नाही का? रायगडच्या पनवेल, खारघर आणि खालापूर परिसरात चालणाऱ्या बारमध्ये बांगलादेशी मुली काम करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्यात त्यांची शहानिशा मुलींना बार सव्‍‌र्हिस परवाना देणाऱ्या दरेकरबाईंना वाटली नाही का? आणि बारमध्ये दारू पाजायला मुली कशाला लागतात? यांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांइतकेच किंबहुना जास्त प्रमाणात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार  आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांच्याच नवी मुंबई परिसरात हा अनैतिक उद्योग बोकाळला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लेडीज सव्‍‌र्हिस बारचे परवाने रद्द करा, अशी मागणी केली जाते आहे.