दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा.लि. (आरजीपीपी) या कंपनीसाठी द्रवरूप वायू घेऊन आलेले जहाज सुरक्षितपणे जेटीला लावण्यात यश आले असून येत्या दोन दिवसांत वायू उतरवण्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.  देशातील नैसर्गिक वायूचा अपुरा पुरवठा लक्षात घेऊन गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (गेल) रशियाच्या गॅझप्रॉम या कंपनीशी पुढील वीस वर्षांसाठी द्रवरूप वायुपुरवठय़ाचा करार केला आहे. त्यानुसार स्पेनहून पायोनियर हे जहाज १ लाख ३८ हजार घनमीटर वायू घेऊन गेल्या २८ डिसेंबर रोजी गुहागरजवळच्या समुद्रात दाखल झाले. परदेशातून आलेल्या जहाजासंदर्भातील कस्टम आणि बंदर विभागाच्या परवानगीची प्रक्रिया काल पूर्ण झाल्यानंतर जहाज दाभोळ प्रकल्पाच्या जेटीला सुरक्षितपणे लावण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. आता त्यातील द्रवरूप वायू उतरवून घेण्याची प्रक्रिया पुढील सुमारे १५ ते २० दिवस चालेल, असा अंदाज आहे. दाभोळ प्रकल्पातील वीजनिर्मितीसाठी लागणारा नैसर्गिक वायू वगळता उरलेला वायू देशातील खासगी कंपन्यांना विकण्याची गेलची योजना आहे.  यापूर्वी गेल्या एप्रिलमध्ये अशाच प्रकारे परदेशी जहाजातून आलेला वायू दाभोळ प्रकल्पाच्या जेटीवर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण तेथील फ्लेंडर तुटल्याने तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर ते जहाज तसेच माघारी पाठवावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर आवश्यक दुरुस्त्या करून पायोनियर जहाज यशस्वीपणे जेटीला लावण्यात आले. त्यामुळे द्रवरूप वायू उतरवून घेण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. अपेक्षेनुसार पुढील तांत्रिक बाबी यशस्वीपणे पार पडल्यास देशाला लागणारा नैसर्गिक वायू दीर्घकाळ विनासायास उपलब्ध होऊ शकणार आहे. त्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक मानली जाते.