पैशासाठी पत्नीचा पेटवून देऊन खून केल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने सलीम कासम शेख (वय २५, रा. तिसगाव, पाथर्डी) या तरुणास जन्मठेपेची शिक्षा दिली. विवाहानंतर सातच महिन्यांत ही घटना घडली होती.
जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी या खटल्याचा निकाल मंगळवारी दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील रमेश जगताप यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सलीम शेख याचा नगरमधील परवीन (वय १९) हिच्याशी २५ मार्च २०१२ रोजी विवाह झाला होता. दोघेही जवखेडे (पाथर्डी) येथे राहात होते. काही दिवसांनंतर पुन्हा तिसगावला राहण्यास गेले. परवीनने माहेरहून घरखर्चासाठी २० हजार रुपये आणावेत यासाठी सलीम तिचा छळ करत होता. परवीनची आई पैसे देऊ शकली नाही म्हणून २७ ऑक्टोबर २०१२च्या रात्री ९च्या सुमारास परवीनच्या अंगावर रॉकेल ओतून व तिला पेटवून देऊन पळून गेला, नंतर शेजारील लोकांनी परवीनला नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. परवीनचा रुग्णालयात विशेष दंडाधिका-यांपुढे मृत्युपूर्व जबाब नोंदवण्यात आला होता.
पाथर्डी पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. खटल्यात परवीनचा भाऊ गौस महमद गुलाम महमद शेख याची साक्ष महत्त्वाची ठरली.