ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण असल्याची जाणीव भाजपला असून मनसेमध्ये भाजपला नवा मित्र दिसू लागला आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा समावेश असलेल्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला विरोध दर्शवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन राज ठाकरे आणि चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर यांच्यात चर्चा घडवून आणली आणि शेवटी ऐ दिल है मुश्किलच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. मनसेला राजकीय फायदा मिळाल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी या वादात मध्यस्थी घडवून आणली आहे. पण ऐ दिले हे मुश्किलच्या माध्यमातून भाजपने मनसेशी डिल करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यामध्ये भाजपवर घणाघाती टीकास्त्र सोडले. तर इकडे मुंबईत फडणवीस यांनी राज ठाकरेंशी चर्चा करुन एक पाऊल पुढे टाकले आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेत असले तरी दोघांमधील संबंध आता सर्वश्रृत आहे. सत्तेत असूनही शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसेनेला शह द्यायचा असेल तर आधी मुंबई महापालिकेतून त्यांना हद्दपार करणे गरजेचे असल्याचे भाजपला वाटते. त्यासाठीच भाजपने कंबर कसली असून फडणवीस – राज ठाकरे भेटीकडे त्याच दृष्टीने बघितले जात आहे.

मुंबई महानगर परिसरातून ६० आमदार आणि ११ खासदार निवडून येतात. सर्वाधिक खासदारांच्या यादीत महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशनंतर नंबर लागतो. राज्यातून ४८ खासदार निवडून येतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी मुंबई महानगर परिसर महत्त्वाचा आहे. या भागात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला आता नवीन साथीदाराची गरज आहे आणि ती गरज मनसेच्या रुपात पूर्ण होऊ शकते. आता देवेंद्र फडणवीस यांची डील फळाला येते की फसते यावरच भाजपची मदार अवलंबून आहे. शिवसेना बिगर महाराष्ट्रीयांच्या विरोधात होती तेव्हा १९६० – ७० च्या दशकात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने वेगळा मार्ग अवलंबिला. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सरकारचा छुपा पाठिंबा होता आणि आता तोच कित्ता भाजप मनसेबाबत गिरवत असल्याची चर्चा आता रंगली आहे.