नवे काहीतरी करण्याचा आत्मविश्वास, धाकधूक, विजिगिषू वृत्ती आणि खिलाडूपणाही..या एकांकिका स्पर्धेची ओळख असलेल्या वातावरणाला तरुणाईचे भावविश्व रविवारी उलगडले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची पुणे केंद्राची प्राथमिक फेरी गाजवली ती विद्यार्थी लेखकांनी! नवीन विषयांची प्रगल्भ मांडणी आणि सादरीकरणातील कल्पकता हे या वर्षीच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वैशिष्टय़ ठरले. प्राथमिक फेरीतून सहा संघांची निवड पुण्यातील विभागीय अंतिम फेरीसाठी झाली आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी रविवारी जल्लोषात पार पडली. ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांच्या हस्ते या फेरीचे उद्घाटन झाले. पुणे आणि परिसरातील २१ महाविद्यालयांनी या फेरीत आपला आविष्कार सादर केला. कराड, बारामती आणि लोणावळ्यातील महाविद्यालयेही प्राथमिक फेरीत सहभागी झाली होती. प्रसिद्ध रंगकर्मी दिलीप जोगळेकर, सारंग साठय़े, राधिका इंगळे, मिलिंद शिंत्रे, प्रविण तरडे, अश्विनी परांजपे या दिग्गजांनी या फेरीचे परीक्षण केले. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सतर्फे श्रीरंग देशमुख, कार्तिक केंडे, अभय परळकर कलाकारांची पारख करण्यासाठी उपस्थित होते.

व्यवस्थेमुळे प्रामाणिक माणसाचा चोर होण्याचा प्रवास आणि चोरांच्याच गावातून उभी राहिलेली नवी व्यवस्था अशा व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या विषयांबरोबरच रोजच्या आयुष्यातील साध्या गोष्टींमधून घडणारे नाटय़ संहितांमधून उलगडले. प्रकाशात न आलेला इतिहासातील प्रसंग उभा राहिला, तर दुसरीकडे द. मा. मिरासदारांच्या कथेतील गंमतही सादरीकरणातून समोर आले. मुलांवर होणारे अत्याचारही विद्यार्थी लेखकांच्या लेखणीतून उतरले.

विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या संघांमध्ये १३ ऑक्टोबरला विभागीय अंतिम फेरीची सुरस रंगणार आहे.

प्राथमिक फेरीचा निकाल

’इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – आंधळे चष्मे

’बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) – व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन

’महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) – कश्ती

’सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, वडगाव – रोहिणी

’फग्र्युसन महाविद्यालय – पिंपरान

गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स – जार ऑफ एल्पिस