शहरातील लोखंडी पुलाजवळ (स्टेशन रस्ता) अतिक्रमणात गेली अनेक वर्षे सुरू असलेली वीटभट्टी तहसीलदारांनी अखेर बंद केली आहे. ही वीटभट्टी तात्काळ बंद करून सील करावी असा आदेशच त्यांनी काढला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते यांनी ही माहिती दिली. नदीपात्रातील गाळपेर क्षेत्रात अतिक्रमण करून गेली वर्षांनुवर्षे विनापरवाना सुरू असलेली ही वीटभट्टी बंद करून संबंधितांवर कारवाई करावी यासाठी टाक यांचा दीर्घ काळ संघर्ष सुरू होता.
देवीदास अकोलकर यांची ही वीटभट्टी आहे. राजकीय नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधांचा गैरफायदा घेऊन ते बेकायदेशीररीत्या ही वीटभट्टी चालवत होते, अशी तक्रार टाक यांनी केली होती. त्यांनी सांगितले, की सरकारी खुली जागा बळकावून गेल्या अनेक वर्षांपासून अकोलकर हे अवैधरीत्या वीटभट्टी चालवत होते. शेजारीच गजानन हौसिंग सोसायटी ही निवासी वसाहत असून येथील रहिवाशांना या वीटभट्टीचा कमालीचा त्रास होता. या रहिवाशांनी या वीटभट्टीला वेळोवेळी विरोधही केला होता. विटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी राख व मातीच्या धुरळय़ामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडले आहेत.
अकोलकर यांच्या दहशतीमुळे कोणी याबाबत तक्रार करीत नव्हते, मात्र आपण याबाबत महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून दीर्घकाळ या गोष्टीचा पाठपुरावा केला. गेली दोन वर्षे हा संघर्ष सुरू होता. अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल मनपाने अकोलकर यांच्या विरोधात नगर विकास अधिनियमानुसार पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांनी या तक्रारीची शहानिशा करून अखेर ही वीटभट्टी बंद करण्याचा आदेश दिला. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी आणि हा भूखंड गजानन हौसिंग सोसायटीच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी टाक यांनी आता केली आहे.