जिल्ह्य़ातील तेराही तालुक्यात यावर्षी ११ हजार ३७३ हेक्टरवर कांदा आणि कांदा बियाण्यांची लागवड करण्यात आली, तर पानमळ्याचे बहुवार्षिक पीक सुमारे ५०० हेक्टरवर घेतले जाते. यावर्षी सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि मार्च, एप्रिलमधील वादळांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे पीक उध्दवस्त झाले आहे. कांदा बियाणांसाठी लागणारा हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये उत्पादन खर्च लक्षात घेता, या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र, या पिकांचा नुकसानीच्या यादीत समावेशच नसल्यामुळे आजवर हे शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. तेव्हा त्यांचा पीक यादीत समावेश करून किंवा विशेष बाब म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी आमदार बोद्रे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गेल्या २०१३ पासून बुलढाणा जिल्हा कमी अधिक प्रमाणात सतत दुष्काळाचा सामना करीत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी नापिकी, तर कधी वादळ वाऱ्यासह अवेळी पडणारा पाऊस आणि अतिवृष्टी त्याचबरोबर सतत होत असलेली गारपीट, यामुळे शेतकरी पुरता उध्दवस्त झालेला आहे. शासनाने नापिकी आणि गारपिटीसाठी मदतही जाहीर केली.
मात्र, या त्यापासून अद्याप अनेक शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांना मदत देताना प्रशासन रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कांदा आणि कांदा बियाणे उत्पादनाला मदतीसाठी पात्र धरत नाही. तसेच बहुवार्षिक पीक असलेल्या या भागातील पानमळ्यांनाही मदतीपासून आजवर वंचित राहावे लागले आहे. याही पिकांचा यादीत समावेश करून या शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी यापूर्वीही आणि या अधिवेशनातही झालेल्या चर्चेतही सभागृहाचे लक्ष वेधले. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.

पिकाच्या नुकसानीची पाहणी
अलीकडेच ११ व १२ एप्रिलला दुपारनंतर सुसाट वारा व विजेचा गडगडाटासह पावसाने परिसरात कहर केला. यात काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे नुकसानग्रस्त भागाची १५ एप्रिलला आमदार राहुल बोद्रे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष तुषार भावसार, समाधान परिहार, विजय शेजोळ, बिंदूसिंग इंगळे, प्रकाश लोखंडे, विलास चव्हाण, विजय वाघमारे, भिकनराव ठेंग, राधेश्याम ठेंग, समाधान पंडागळे, प्रमोद साळवे, महसूल विभागाचे काकडे यांची उपस्थिती होती.