नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुला-मुलीच्या लग्नात विविध जबाबदाऱया उचलणाऱया शहा कन्स्ट्रक्शन यांच्या कराडमधील कार्यालयांवर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी भास्कर जाधव यांचीही चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे.
कराडमधील शहा कन्स्ट्रक्शनच्या पंकज हॉटेलवर प्राप्तिकर विभागाचे सहा जणाचे पथक मंगळवारी सकाळी पोहोचले. त्याचवेळी शहरातील इतर कार्यालयांवरही प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी छापा टाकून तेथे कागदपत्रांची तपासणी सुरू केली. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
भास्कर जाधव यांनी आपला मुलगा आणि मुलीच्या एकत्रितपणे केलेल्या लग्नात वारेमाप खर्च केल्याचे दिसून आले होते. लग्नासाठी चिपळूणमध्ये मोठा मंडप घालण्यात आला होता. तसेच विविध ५६ पदार्थांचा समावेश असलेले जेवण पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले होते. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना लग्नावर एवढा मोठा खर्च केल्यामुळे जाधव यांच्यावर विविध स्तरांतून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लग्नात इतकी उधळपट्टी करणाऱयांनी सार्वजनिक जीवनात राहण्याचा फेरविचार केला पाहिजे, या शब्दांत जाधव यांना फटकारले होते.
शहा कन्स्ट्रक्शनचे मालक आणि आपल्यामध्ये जुने संबंध असल्याचे जाधव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. लग्नाची सर्व जबाबदारी आपल्याकडे द्यावी, अशी आग्रही विनंती शहा यांनी केल्यामुळेच आपण त्यांच्याकडे सर्व जबाबदारी दिली होती. लग्नासाठी आलेला खर्च आपण शहा यांना देणार आहोत, असेही जाधव यांनी स्पष्ट केले होते.