राज्य सरासरीच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात दुधाची उपलब्धता कमी असतानाच अन्न उत्पादन आणि नैसर्गिक स्त्रोत संकुचित होत असल्याने पशुधन वाढवण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर आहे. अमरावती जिल्ह्याचे दैनिक सरासरी दूध संकलन हे केवळ १ लाख ११ हजार लिटर्स असून दुधाची गरज भागवण्यासाठी इतर जिल्ह्यांवर विसंबून राहण्याची स्थिती आहे. 

पशुसंवर्धन हा कृषीक्षेत्राला पूरक, अशी म्हणून नव्हे, तर हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. पशुधनातील मोठा वाटा ग्रामीण भागातील लोकांकडे आहे. पशुधनाची मागणी वाढत आहे. नव्या पिढीत अन्नविषयक प्राथमिकता बदलत आहेत. मात्र, कमी नफयाचा विषय हा या क्षेत्रासाठी सर्वात धोकादायक बनला आहे. अमरावती जिल्ह्यात ७७ हजार स्थानिक गायी, तर १३ हजार ८०० सुधारित गायी आहेत. म्हशींपैकी ३४ हजार १९६ स्थानिक, तर केवळ ११३७ सुधारित आहेत. वैज्ञानिक पद्धतीने चारा, कृत्रिम रेतन आणि आरोग्य काळजी यातून पशुधनाची गुणवत्ता आणि संख्या वाढवणे, पशुधनाची उत्पादनक्षमता किमान राज्य सरासरीपर्यंत वाढवणे, दूध, मांस, अंडी या पशुजन्य पदार्थाचे उत्पादन वाढवणे, पशुजन्य उत्पादनांना खात्रीलायक बाजारपेठ मिळवून देणे, अशा उपाययोजना राबवल्यास जिल्ह्यात पशुसंवर्धनाला चांगले दिवस येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. पशुधनातील मोठा भाग हा देशी जनावरांचा आहे. मात्र, संकरित, सुधारित जातीच्या जनावरांची संख्या अल्प आहे. देशी जनावरांच्या जागी सुधारित आणि संकरित अधिक उत्पादनक्षम जनावरे आणणे गरजेचे आहे. संकरित, तसेच सुधारित जातीच्या गायी-म्हशींमुळे दुग्धोत्पादनात वाढ होऊ शकेल.
अमरावती जिल्ह्यात सरासरी ४५ हजार गायी आणि म्हशींचे कृत्रिम रेतन केले जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. कृत्रिम रेतन वाढीसाठी पशुपालकांना अधिक प्रोत्साहन आणि निधी दिला पाहिजे. प्रत्येक कृत्रिम रेतनासाठी २०० रुपये खर्च येतो. म्हणजेच वर्षांकाठी ९० लाख रुपयांची गरज लागणार आहे. या जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १४००० गायी कृत्रिम रेतनातून जन्माला येतात. त्यापैकी ७ हजार बैल असतात, पण पशुपालक प्रत्येक वासराला गायीचे दूध उपलब्ध करून देऊ शकत नाही. प्रत्येक वासराला ५०० कि.ग्रॅ. पशूखाद्याची गरज असते. त्यासाठी अंदाजे ७ कोटी रुपयांचा खर्च येईल.
अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे २८ लाख असून जनावरांच्या मांसाची मोठी गरज आहे. शेळीचे मांस सर्वाधिक पसंत केले जाते. गाव पातळीवरील शेळीपालन हे पारंपरिक पद्धतीचे आहे. उस्मानाबादी शेळ्यांपासून संकर घडवून आणून अधिक उत्पादनक्षम शेळ्या तयार केल्या जाऊ शकतात.
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श प्रशिक्षण केंद्रांच्या मदतीने पशूपालन व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे, अमरावती जिल्ह्यात चारा बँक तयार करणे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दुर्गम भागात फिरती पशुवैद्यकीय दवाखाने तयार करणे, प्रत्येक तालुक्यात पशूधन व्यवसायासाठी क्लस्टर निर्माण करणे, जिल्ह्यात पशूधन व्यवसाय विकासासाठी सुयोग्य जागेचा शोध आणि निवड करून शिफारस करणे, अशा उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.