विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती

जर आमच्या बहिणी-मुली सुरक्षित नसतील तर आम्हाला गणवेश घालण्याचा अधिकार नाही. महिलांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असून, लवकरच यासाठी हैदराबादच्या धरतीवर  ‘सी टीम’ची स्थापना करणार असल्याचे मत कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले. येत्या स्वातंत्र्यदिनापासून प्रत्येक जिल्ह्य़ात ‘सायबर लॅब’ची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नांगरे पाटील म्हणाले,ह्वमहिलांच्या प्रश्नांबाबत आम्ही सजग आहोत. हैदराबादमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सी टीम’ नावाची यंत्रणा तयार केली आहे. या धर्तीवरच महाराष्ट्रात अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे. यासाठी परिक्षेत्रातील सहा अधिकारी हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच प्रत्येक जिल्ह्य़ात अशा ‘सी टीम’ची स्थापना केली जाणार आहे.

या प्रत्येक गटामध्ये सहा महिला पोलीस राहतील. हा गट महिलांना त्रासदायक अशा स्थळांचे सर्वेक्षण करील. यानंतर अशा भागांवर लक्ष केंद्रित करून त्रास देणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. त्यांचे अगोदर समुपदेशन करण्यात येईल. पण यानंतरही त्यांच्या वागण्यात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या महिलांवरील अत्याचार प्रतिबंधाबाबत चित्रफिती तयार केल्या असून, प्रत्येक महाविद्यालयात त्या दाखवल्या जाणार आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी  प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘महामार्ग पोलीस’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. यात महामार्गावरील मोठय़ा गावामधून गस्त घातली जाणार आहे. दर पंधरा मिनिटांनी पोलिसांची एक गाडी महामार्गावरून देखरेखीसाठी जाण्याचे नियोजन केले जाणार आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ‘सायबर लॅब’ कार्यान्वित होणार आहेत. सध्या ‘सायबर गुन्ह्य़ांमध्ये मोठी वाढ होत आहे. अशा वेळी या प्रयोगशाळेतून सोशल मीडिया, मोबाइल, सीसी टीव्ही, संगणकावरील तपशील यावर संशोधनाचे काम केले जाणार आहे. यासाठी सुमारे साठ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी अशा स्थळांवर शिस्त निर्माण केली जाणार असल्याचेही नांगरे पाटील यांनी या वेळी सांगितले.