भारत हा नेहमीच मांसाहारींचा देश राहिला असून अजूनही देशातील ८० टक्के जनता मांसाहारच करते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मांसाहारावर बंदी आल्यास माझ्यासारख्या अनेकांचा भूकबळी जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बहुमताने निवडून आलेल्या भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्त्ववादी प्रतिमा असलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. गोहत्याविरोधक असलेल्या आदित्यनाथांनी अवैध कत्तलखान्यावर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मांसाहार आणि शाकाहार यावरुन वाद सुरु झाले आहेत.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर या वादावर भाष्य केले आहे. भारताला आता शाकाहारींचा देश बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि उत्तरप्रदेशमध्ये त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. हिंदूराष्ट्रच्या दिशेने हे पाऊल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशातील ८० टक्के जनता हे मांसाहार करते. त्यामुळे यावर बंदी आल्यास अनेकांचा भूकबळीच जाईल असे त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशमध्ये अवैधपणे गायींची तस्करी करणाऱ्या आणि बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेशच पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यात येतील आणि सर्व यांत्रिक कत्तलखान्यांवर पूर्णपणे बंदी घातली जाईल, असे निवडणुकांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केले होते.११ जिल्ह्य़ांमध्ये गुरे व मांस यांची अवैध वाहतूक, कत्तलखाने आणि गोहत्या यांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत १२ बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकले आहे. तसेच गायींची तस्करी केल्याप्रकरणी २७ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, ४३ जणांना अटक करण्यात आली आहे.