देशातील विद्यमान सत्ताधारी गांधीजींचे नाव पुसण्याचे काम करीत आहेत. त्यांना हिंदू राष्ट्र हवे असले तरी धर्माधिष्ठीत राष्ट्र केल्यावर पाकिस्तानची काय अवस्था झाली आहे हे यावरून तरी हिंदू राष्ट्राची अपेक्षा बाळगणाऱ्यांनी बोध घ्यावा. अन्यथा धर्मनिष्ठ राष्ट्र बनवण्याच्या हट्टापायी भारताचा पाकिस्तान होईल अशी भीती ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई वैद्य यांनी व्यक्त केली.
थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे आयोजित स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. मंदाकिनी आमटे, अधिवेशनाचे निमंत्रक माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नृसिंह चिवटे, हसनभाई देसाई, विजय देशपांडे यांची उपस्थिती होती.
भाई वैद्य म्हणाले, की हिटलर ज्या पध्दतीने लढला तीच पध्दत विरोध संपवण्यासाठी या देशात सध्या सुरू असून, विचारांची लढाई विचाराने न लढता आता, विचारांच्या लढाईला गोळीने संपवले जाऊ लागले आहे. देशात हिटलरशाही, फॅसिझम् वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हिंदू राष्ट्र करण्याच्या नादात भारत देशाचे वाटोळे होईल.
सर्वाच्या किमान गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपला स्वातंत्र्य लढा संपणार नाही. स्वातंत्र्यसैनिक संपत चालले असले तरी त्यांचे विचार उंडाळेसारख्या स्वातंत्र्यसैनिक अधिवेशनाच्या माध्यमातून जोपासले जात आहेत. ते यापुढेही जोपासले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा आमटे कुटुंबाचे समाजकार्य महात्मा गांधीजींप्रमाणेच विलक्षण असून, आजची देशसेवा आलिशान गाडय़ांतून, ऐशोआराम भोगत स्वत:चं उखळ पांढरं करण्याचा व्यवसाय बनला असताना, अशा स्थितीत प्रकाश आमटे यांची देशसेवा दीपस्तंभासारखी असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, की जिथं माणसं राहतात, हेच जगाला माहिती नव्हतं. अशा ठिकाणी जाऊन समाजसेवेचं कार्य साधावं हा बाबांनी घडवलेला चमत्कारच म्हणावा लागेल. ज्या ठिकाणी अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून, आम्ही चार-पाच दिवसांनी पोहोचलो तेथे काम करायचं म्हणजे अनंत अडचणी होत्या. तिथं आम्ही कामास सुरुवात केली. अन् तेथील जग बदलण्यात यश आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. प्राणी कितीही हिंस्त्र असला तरी त्याला आपल्या प्रेमाणे बदलता येते. आम्ही बिबटे, अस्वले व सापांशी मैत्री करून, त्यांना कुटुंबाचे सदस्य बनवून टाकले आहे. जंगली प्राण्यांशी आमची नाळ जुळली. त्याची आम्हाला भीती वाटत नाही. पण, दोन पायाच्या माणसाची मात्र भीती वाटू लागली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ लाभाची अपेक्षा न बाळगता काम करीत राहिल्यास यश आपल्याबरोबरच येतं असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड. विजय पाटील यांनी केले. दादा उंडाळकर स्मारक समितीचे प्रमुख विश्वस्त प्राचार्य प. ता. थोरात, जयसिंगराव पाटील, विठ्ठलराव जाधव, दादासाहब गोडसे, उषा खरे यांची यावेळी उपस्थिती होती.