‘सुखोई’चे दहा वर्षांतील उड्डाणतास पूर्णपणे वापरता यावेत, याकरिता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) या विमानांच्या संपूर्ण देखभाल व दुरुस्तीचा (ओव्हरहॉल) कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विशेष अभ्यास हाती घेण्यात आला असून मार्चपर्यंत तो पूर्णत्वास जाईल. ‘ओव्हरहॉल’चा कालावधी वृद्धिंगत झाल्यास हवाई दलास सुखोईच्या उड्डाणतासांचे सोसावे लागणारे नुकसान टळू शकेल.  यानिमित्ताने विमानबांधणीच्या तुलनेत काहीशा क्लिष्ट पण महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या या प्रक्रियेत पारंगत होण्याची संधी भारतीय तंत्रज्ञांना मिळणार आहे.  हवाई दलाच्या ताफ्यातील ‘सुखोई ३० एमकेआय’ या अत्याधुनिक लढाऊविमानांची पुनर्तपासणी प्रक्रिया देशात प्रथमच सुरू झाली आहे. त्याअंतर्गत दोन सुखोई ‘ओव्हरहॉल’साठी नाशिकच्या एचएएल कारखान्यात दाखल झाले आहेत.    

काय आहे ‘ओव्हरहॉल’?
कार्यरत लढाऊ विमानातील प्रत्येक यंत्रणा, उपकरण व सुटय़ा भागांची अतिशय सखोलपणे केली जाणारी छाननी आणि त्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या दुरुस्तीला लष्करी परिभाषेत ‘ओव्हरहॉल’ म्हटले जाते. नव्या विमानाची बांधणी आणि कार्यरत विमानांची पुनर्तपासणी यात कमालीचा फरक असतो. नव्या विमानाच्या बांधणीत सर्व सुटय़ा भागांची निकषानुसार जोडणी करावी लागते. मात्र, पुनर्तपासणीत काही वर्षे कार्यरत राहिलेल्या विमानाचे सर्व भाग विलग करून सुटय़ा भागांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन केले जाते. प्रत्येक विभागाशी संबंधित प्रयोगशाळेत सखोल छाननीद्वारे ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाते. त्यात दोष असणारे सुटे भाग काढून त्यांच्या जागी नवीन भाग बसविले जातात.

‘ओव्हरहॉल’ची गरज का?
प्रत्येक सुखोईचे सुरक्षिततेच्या दृष्टीने दर दहा वर्षांनी ‘ओव्हरहॉल’ करावे लागते. या काळात सुखोईने १५०० तास उड्डाण करणे अभिप्रेत आहे; परंतु ओव्हरहॉलच्या कालावधीपर्यंत हे उड्डाणतास पूर्ण होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे हे उड्डाणतास पूर्ण होण्याआधीच दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आल्यास त्याचे ओव्हरहॉल करावेच लागते. या स्थितीत हवाई दलास विहित कालावधीतील विमानाचे पूर्ण आयुष्य वापरता येत नाही. त्या वेळेपर्यंत शिल्लक राहणारे उड्डाणतास तसेच सोडून द्यावे लागतात. परिणामी, ‘त्या’ उड्डाणतासांचे नुकसान सोसावे लागते.

अभ्यासाचा फायदा काय?
 एचएएलने ओव्हरहॉलचा कालावधी दहावरून बारा वर्षांपर्यंत वृद्धिंगत करण्याचा अभ्यास सुरू केल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रकाश देशमुख यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हा अभ्यास यशस्वी ठरल्यास सुखोईच्या उड्डाणतासांचे होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे. ओव्हरहॉलचा कालावधी वाढल्याने हवाई दलास आणखी दोन वर्षे सुखोई कार्यान्वित ठेवून उड्डाणतासाचे आयुष्य पूर्णपणे वापरण्यासाठी मिळतील, असे देशमुख यांनी सांगितले.