चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्य़ात खनिज संपत्तीची भरमार आहे. टंगस्टन, कोळसा, चुनखडी, मँगनीज, लोहखनिज आणि डोलोमाइट या अत्यंत उपयुक्त खनिजांना विदर्भात सद्यस्थितीत तोटा नाही. चुनखडी उद्योगात एसीसी, एल अ‍ॅण्ड टी, माणिकगड, अंबुजा, पुरोहित, मुरली इंडस्ट्रीज, लोह खनिज उद्योगात सनफ्लॅग लॉइड स्टील, मेटल लॉइड, गुप्ता मेटॅलिक्स, गोपानी आयर्न, इस्पात वीरांगना, ग्रेस इंडस्ट्रीज, महाराष्ट्र इलेक्ट्रो आणि मँगनीजमध्ये पॅरामाऊंट आणि माइल या कंपन्यांच्या खाणीसंबंधित उद्योग विदर्भात कार्यरत आहेत. खाण कामगारांसाठीचे पोषक वातावरण, निवासव्यवस्था, कॅन्टिन, आरोग्याच्या सुविधांबाबतही असंख्य तक्रारी आहेत. कामगार संघटनांचे प्राबल्यही काही ठिकाणी आहे; परंतु उद्योग उभारणीसाठी संधी मिळाल्यास उद्योजक विदर्भात येण्यास एका पायावर तयार आहेत. विदर्भातील खनिज संपत्तीवर आता उद्योजकांची नजर पडलेली आहे.
विदर्भातील समृद्ध खनिज संपत्तीची पारख जमशेदजी टाटा यांनी शंभर वर्षांपूर्वीच केली होती. परंतु त्यांची संधी हुकली आणि अन्य प्रदेशांच्या विकासाच्या तुलनेत विदर्भ शंभर वर्षे मागे गेला. सूरजागडला पोलाद कारखाना सुरू झाला असता तर चित्र बदलले असते. रेल्वेचे जाळे विदर्भात पोहोचले नसल्याने हा बेत टाटांना सोडून द्यावा लागला. मात्र, नागपूरला एम्प्रेस मिलची उभारणी त्यांनी केली. मात्र अन्य जिल्ह्य़ांमधील खनिज संपत्ती खणून काढण्याइतपत उद्योगांची उभारणी विदर्भात झालेली नाही. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्य़ात कोळशाचे साठे आहेत. मँगनीज नागपूर आणि भंडारा जिल्ह्य़ात विपुल प्रमाणात सापडते. चंद्रपूर आणि गडचिरोलीत लोह खनिजांचे साठे दडलेले आहेत. दोन्ही जिल्ह्य़ांवर नक्षलवादाचा प्रभाव आहे. चंद्रपूर त्यामानाने औद्योगिक उभारणीत मैलाचा दगड ठरला असताना गडचिरोली जिल्हा मात्र माघारला आहे. गडचिरोलीत आता बारमाही रस्त्यांची सोय झाली आहे. फक्त रेल्वे लाइन नसल्याने या दोन्ही जिल्ह्य़ांकडे पाहण्याचा औद्योगिक दृष्टिकोन थोडासा धास्तीचा असतो. आता चित्र बदलण्याची वेळ आली आहे.
चंद्रपूर आणि यवतमाळातील चुनखडक औद्योगिक विकासाचे केंद्र बनू शकतात. चुनखडीचा वापर सिमेंट तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. यातून होणारी रोजगारनिर्मितीही मोठी राहणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्य़ांत डोलामाइट प्रचंड प्रमाणात सापडते. याचे लक्षावधी टनांचे साठे उपयोगिता न होता पडून आहेत. यावरील उद्योगांना मोठी संधी आहे. भंडारा जिल्हादेखील खनिज संपत्तीने समृद्ध असून या जिल्ह्य़ातील औद्योगिक विकासाचे टप्पे अनेक अडथळ्यांनी थांबलेले आहेत. उच्च प्रतीच्या उष्णतारोधक विटांसाठी वापरले जाणारे कायनाइट आणि सिलिमनाइट एकटय़ा भंडारा जिल्ह्य़ातच आहे. काच उद्योगात याचा वापर केला जात असल्याने यावर उद्योजकांचा डोळा आहे. नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्य़ात क्रोमाइटचे साठे आहेत. तेल विहिरींच्या खोदकामात आणि पेंट व्यावसायिकांसाठी मोलाचे ठरणारे बेराइट चंद्रपुरात आढळते. तसेच चंद्रपुरात फ्लोराइटही आढळून आले आहे. शिवाय नागपूर आणि चंद्रपुरात तांबे या खनिजाचे साठे असून पितळ, तांबे उद्योग एके काळी भंडारा जिल्ह्य़ात पसरलेला होता. पितळेचे काम करणारे हात आता बेरोजगार झाले आहेत. साडेआठ लाख टनांचे जस्ताचे साठे नागपूर जिल्ह्य़ात आहेत. कोलारीचा पट्टा जस्ताची सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो. खनिज संपत्तीची भरमार असलेल्या विदर्भात त्या तुलनेत खनिज प्रक्रिया उद्योगांची मात्र मारामार आहे.