फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरपीआय संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला वाईत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून निषेध नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील विटंबनेच्या प्रकारानंतर फेसबुक या सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फोटोची विटंबना करून आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. त्याचे संपूर्ण जिल्हय़ात पडसाद उमटले. सोमवारी वाईचा आठवडा बाजार असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, भाजीविक्रेत्यांची व सर्वसामान्य जनतेची गरसोय होऊ नये यासाठी मंगळवारी वाई बंदचे आवाहन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. तसेच सर्वसामान्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आज वाईकरांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने, हॉटेल, वडापच्या गाडय़ा, रिक्षा बंद होते.  
या वेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून आपला निषेध नोंदविला. या वेळी जिल्हाध्यक्ष गायकवाड, तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे, स्वप्नील गायकवाड, संतोष गायकवाड, युसूफ बागवान, श्रीनिवास घाडगे, दिलीप घाडगे आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.
दरम्यान बंदच्या पाश्र्वभूमीवर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बठक घेऊन शांततेच्या मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन केले होते. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.