मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या काही सहकाऱ्यांना घेऊन गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास निलंग्याहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केलेले हेलिकॉप्टर क्षणार्धातच कोसळले. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी बालंबाल बचावले. हा अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या नागरी हवाई उड्डाण विभागाचे एक पथक शुक्रवारी सकाळी निलंग्यात दाखल झाले असून, ते या अपघाताची कसून चौकशी करत आहेत.

हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर चोवीस तास पोलीस देखरेखीखाली आहे. आणखीन किमान चार दिवस त्याच जागेवर हेलिकॉप्टर राहील. अपघाताची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नागरी हवाई उड्डाण विभाग मुंबईचे सहायक संचालक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम रेड्डी व इतर पाच जणांचे चौकशी पथक निलंग्यात पाठवले आहे. शुक्रवारी सकाळी या पथकाने दुर्घटनाग्रस्त स्थळाची व हेलिकॉप्टरची पाहणी केली. आवश्यक त्या नोंदी त्यांनी घेतल्याची माहिती महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे पाटील यांनी दिली. या वेळी तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. जी. वैष्णव आदी उपस्थित होते.

या दुर्घटनेबाबत निलंगा पोलीस ठाण्यात नसíगक अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: बाहेर पडले. त्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले पोलीस अधिकारी व कंमांडोंना त्यांनी मी सुरक्षित आहे. हेलिकॉप्टरमधील इतरांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांनी दिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बंदोबस्तासाठी असलेले कमांडो, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी तातडीने हेलिकॉप्टरकडे धाव घेतली. मुख्यमंत्री स्वत: हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. माझी चिंता करू नका, इतरांना बाहेर काढा, असे म्हणाल्याचे रांजणकर यांनी सांगितले. हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पथक दाखल झाल्यानंतर आता प्रशासनातील प्रत्येक अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.

केंद्राचे पथक दाखल

निलंगा येथील हेलिकॉप्टरच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या नागरी हवाई उड्डाण विभागाचे विशेष पथक शुक्रवारी सायंकाळी ४.४० वाजता दाखल झाले. जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे चार जणांचे पथक असून, या पथकात वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. हे पथक दाखल होताच हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बाबीची तपासणी त्यांनी तातडीने सुरू केली आहे.