महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतक ऱ्यांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने जाफराबाद पोलिसांना दिला.
शेतक ऱ्यांजवळ मोबाइलचे बिल भरण्यास पैसे आहेत. परंतु वीजबिल भरण्यासाठी मात्र पैसे नसल्याने वक्तव्य खडसे यांनी अकोला येथे केले होते. खडसे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील शेतक ऱ्यांची बदनामी झाली असल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या ४९९ आणि ५०० कलमान्वये गुन्हा दाखल करावा, असा अर्ज काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवळी यांनी २५ नोव्हेंबरला जाफराबाद पोलिसांकडे केला होता. परंतु गुन्हा दाखल होत नसल्यामुळे गवळी यांनी २२ डिसेंबरला जाफराबाद न्यायालयात अर्ज देऊन खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. जाफराबाद येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी सचिन तट यांनी मंगळवारी या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश सीआरपीसीच्या २०२ कलमान्वये जाफराबाद पोलिसांना दिला.