यवतमाळमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन जबाबदार अधिकारी, कंपन्या आणि विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करावे अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे यवतमाळ जिल्ह्यात २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र या प्रकरणासाठी कृषी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही केला जात आहे. या प्रकरणावरुन टीका होत असतानाच सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. प्रशासन आणि कीटकनाशक कंपन्यांकडून पालन करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. ७०० शेतकऱ्यांवर उपचार सुरु असून २५ ते ३० शेतकऱ्यांना दृष्टी गमवावी लागली. त्यामुळे या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या प्रकरणातील जखमींना १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.