मंत्रालयातील पथकामार्फत तपासणी मोहीम ; पुरवठा विभाग अनभिज्ञ

रेशन दुकानातून कमी धान्य दिले जात असल्याच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर, जिल्ह्यातील धान्य गोदामांची मंत्रालयातील पथकामार्फत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे. हा नियमित तपासणीचा भाग असल्याचे सांगितले जात असले तरी शिधापत्रिकाधारकांनी केलेल्या अपुऱ्या धान्य पुरवठय़ाच्या तक्रारीची किनार त्यास आहे.

समितीने गुरूवारी नाशिकरोडच्या धान्य गोदामाची तपासणी केल्यानंतर शुक्रवारी नाशिक तालुका गोदामाची तपासणी केली. साधारणत: दीड वर्षांपूर्वी कोटय़वधींचा धान्य घोटाळा उघडकीस आला होता. सुरगाणा येथे त्याचे मूळ सापडले होते. असे प्रकार टाळण्यासाठी शासकीय पातळीवर दक्षता घेतली जात आहे. त्या अंतर्गत विशिष्ट कालावधीनंतर गोदामांची तपासणी केली जाते. सध्या सुरू असलेली तपासणी हा त्याचाच एक भाग आहे.

समिती गोदामाला भेट देवून शिल्लक धान्य, आतापर्यंत झालेले धान्य वितरण, मंजूर नियतन यांची माहीती घेत आहे. या तपासणीबाबत पुरवठा विभाग अनभिज्ञ आहे.

नाशिकरोडच्या गोदामातून पुरवठा विभाग शहरातील २३० स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा करते. शुक्रवारी या पथकाने कालिका मंदिरामागील नाशिक तालुका गोदामाला भेट देऊन तपासणी केली. तपासणीतून नेमके काय निष्पन्न झाले याची स्पष्टता झालेली नाही.