लाचखोरीच्या प्रकरणात सुरुवातीला मोठी कारवाई केल्याचा आव आणणाऱ्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या कारवाईमुळे मात्र संशयाचे धुके निर्माण झाले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील ‘वजनदार’ फौजदारावर कारवाई करताना ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांचे अवसान गळाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस शिपाई ते उपनिरीक्षक असा प्रवास नांदेडातच करणाऱ्या शिवाजीनगर ठाण्यातील रमेश दत्तात्रय सूर्यतळ याच्याविरुद्ध २० हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलीस विभागात जागरूक व दक्ष अशी ओळख असणाऱ्या लाचलुचपत अधिकाऱ्यांची अनागोंदी शुक्रवारी समोर आली.
न्यायालयीन आदेशावरून गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही कारवाईची धमकी देऊन सूर्यतळ याने २५ हजारांची मागणी केली होती. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने २० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. वैद्यकीय अधिकाऱ्याने लाचलुचपतकडे याबाबत तक्रार दिली. पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. शासकीय विश्रामगृहातील उपाहारगृहात हा वैद्यकीय अधिकारी २० हजार रुपये घेऊन गेला, पण तत्पूर्वीच सूर्यतळ याला कुणकुण लागली होती.
लाचलुचपतच्या कारवाईची सूर्यतळ याला कुणकुण कशी लागली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. उपाहारगृहात पसे घेण्यास सूर्यतळ याने नकार दिला, मात्र त्याने पशाची मागणी केली होती, ही बाब स्पष्ट झाल्याने लाचलुचपत विभागाने पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊन त्याच्याविरुद्ध शनिवारी सकाळी याबाबत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.