नक्षलवादी हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलेला असताना सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिमेच्या दरम्यान मानक कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच छत्तीसगडमध्ये १५ जवानांना प्राण गमवावे लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रतिकूल स्थितीत लढणारे जवान जेव्हा जेव्हा अशा चुका करतात तेव्हा तेव्हा नक्षलवादी डाव साधतात, हे मंगळवारच्या घटनेत दिसून आले आहे.
बस्तर व सुकमा जिल्ह्य़ाला जोडणाऱ्या जिरमच्या पहाडीत मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले. संपूर्ण दंडकारण्यातील गेल्या ३ वर्षांतील ही सर्वात मोठी घटना आहे. यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्या सुरक्षा दलांना मोठा हादरा बसला असला तरी या घटनेत शोधमोहीम राबवणाऱ्या जवानांची चूक मोठी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यांपासून रस्ता बांधणीच्या कामावर सुरक्षा देणारे जवान रोज सकाळी तळावरून जाऊन सायंकाळी परत येत असत. रस्त्यावरून शोधमोहीम राबवतांना त्याच्या दोन्ही बाजूला किमान ५० मीटर अंतरावरून चालावे, असे सूत्र मानक कार्यपद्धतीत निश्चित करण्यात आले आहे. या सूत्रामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात नक्षलवादी दबा धरून बसले असतील तर ते वेळीच लक्षात येते. सुरक्षा दलाच्या जवानांनी नेमके याच सूत्राकडे दुर्लक्ष केले. हे जवान रस्त्यावरून चालत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हीच पद्धत वापरणे सुरू केले होते.
गनिमी काव्यात तरबेज असलेल्या नक्षलवाद्यांनी नेमकी हीच बाब हेरली व सापळा रचला. त्यामुळे या जवानांना गोळीबार सुरू होताच साधा प्रतिकार सुद्धा नीट करता आला नाही. ४० च्या संख्येने असलेल्या या जवानांचे दोन तुकडय़ांमध्ये विभाजन केले होते. पहिल्या तुकडीवर गोळीबार सुरू होताच मागची तुकडी घटनास्थळावरून पळून गेली, अशीही माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या सापळ्यात अडकलेल्या जवानांना कुणाचीही मदत मिळू शकली नाही. परिणामी, मृतांचा आकडा वाढला, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रस्ते बांधणीच्या कामावर रोज जाणाऱ्या या जवानांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी गेल्या १५ दिवसात तीनदा दिला होता. या जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी जहाल नक्षलवादी गंगन्नाच्या नेतृत्वाखाली नक्षलवादी मोठय़ा संख्येत जमले आहेत, असे या इशाऱ्यात नमूद केले होते. गुप्तचरांच्या माहितीवर सध्या टोंगपालला असलेल्या ८० व्या बटालियनच्या अधिकाऱ्यांनी चर्चा सुद्धा केली होती. शोधमोहिमेवर जाणाऱ्या सर्वाना या माहितीची कल्पना देण्यात आली होती. तरीही हे जवान गाफील राहिले. त्यामुळेच नक्षलवाद्यांना डाव साधता आला. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी भरपूर शस्त्रे लुटून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. ६ एके-४७ बनावटीच्या बंदुका, ३ रॉकेट लॉन्चर्स, १ एलएमजी, ९ इन्सास रायफल, २ एसएलआर बनावटीची शस्त्रे नक्षलवाद्यांनी लुटून नेली. या हल्ल्यामुळे आता संपूर्ण दंडकारण्य भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या निवडणुकीत नक्षलवादी आणखी घातपात घडवून आणतील, अशी भीती आहे.