सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ठरविणार आहेत. त्यासाठी उद्या बुधवारी मुंबईत पवार हे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेऊन अध्यक्ष निवडीचा निर्णय घेणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी सांगितले.
या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याच्या आमदार श्यामल बागल, आमदार दीपक साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे आदींची उपस्थिती अपेक्षित आहे. तर शनिवारी पुन्हा पक्षाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर येत्या रविवारी, २१ सप्टेंबर रोजी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला जाणार आहे. येत्या २६ सप्टेंबर अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
जि. प. अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे. अध्यक्षपदासाठी सीमा पाटील (मोहोळ) यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे. याशिवाय जयमाला गायकवाड (सांगोला),अॅड. सुकेशिनी देशमुख (पंढरपूर) व ज्योती मरतडे (उत्तर सोलापूर) यांचीही नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. ६८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे ३४ सदस्य आहेत. काँग्रेसचे १८ सदस्य असून या पक्षाने सत्तेत भागीदारी देण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या तालुकास्तरावरील बऱ्याच नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीत प्रवेश केला आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेतील दोन्ही पक्षांच्या सदस्यांच्या भूमिकेवर होऊ शकतो. यात राष्ट्रवादीअंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट चिन्हे असून यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय शिंदे यांच्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने जिल्ह्य़ातील पक्षांतर्गत राजकारण ढवळून निघत आहे.