महापौर व उपमहापौरपदासाठी येत्या ३० ऑक्टोबरला निवडणूक होणार असून काँग्रेस पक्ष तीन गटात विभागल्याने महापालिकेत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता अधिक दिसत आहे. सध्या या पदासाठी कॉंग्रेसकडून राखी कंचर्लावार, सुनीता अग्रवाल, सुनीता लोढीया, तर भाजपच्या अंजली घोटेकर, राष्ट्रवादीच्या  संगीता त्रिवेदी व विद्यमान महापौर संगीता अमृतकर प्रयत्नशील आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत नाही तोच आता महापालिकेच्या दुसऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान महापौर संगीता अमृतकर व उपमहापौर संदीप आवारी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबरला पूर्ण होत आहे आणि याच दिवशी नवा महापौर निवडायचा आहे. महापालिकेच्या ३३ प्रभागांसाठी एकूण ६६ नगरसेवक आहेत. कॉंग्रेस आघाडी व मित्रपक्षांचे ३८, भाजप १८, राष्ट्रवादी ४, शिवसेना ५ व मनसे १, असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महापौरपदासाठी ३४ हा ‘मॅजिक फिगर’ असल्याने संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप व कॉंग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेस आघाडीत ३८ नगरसेवक दिसत असले तरी काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, सभापती व गटनेते रामू तिवारी-संतोष लहामगे-संगीता अमृतकर आणि शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, अशा तीन गटात विभागल्या गेले, तर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधात काम केल्याने भाजपने बलराम डोडाणी निलंबित झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व भाजपचे संख्याबळ जुळत नसले तरी राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत असतांना येथेही भाजपचा महापौर बसण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभेत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत सभापती तिवारी व महापौर अमृतकर यांना निलंबित केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दिवशी या दोघांचे निलंबन परत घेण्यात आले. त्यामुळे तिवारी व अमृतकर सध्या कॉंग्रेसमध्ये असले तरी तिवारी भाजपच्या संपर्कात आहेत. रामू तिवारी नको म्हणून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेही भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत, तर नंदू नागरकर यांनी कॉंग्रेस नगरसेवकांची बैठक बोलावून पक्षाचाच महापौर बसावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेसचे तिन्ही गट एकत्र येत नाहीत, याची खात्री असल्याने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, परंतु भाजपची मुख्य अडचण महापौरपदासाठी योग्य व्यक्ती नसणे ही झाली आहे. राज्यातील सरकार स्थापन्याच्या प्रक्रियेत मुनगंटीवार व्यस्त असल्याने खासदार अहीर मनपा निवडणुकीत लक्ष देत आहेत. त्यांना स्वत:ला अंजली घोटेकर महापौरपदी नको आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याने अहीर-तिवारी यांच्यात घनिष्टता वाढली आहे, तर तिवारी यांना सभापतीपद कायम ठेवायचे असल्याने त्या दृष्टीकोनातून राजकारण सुरू आहे. कॉंग्रेस पक्षात सुनीता लोढीया व सुनीता अग्रवाल या नावावर एकमत नाही. राखी कंचर्लावार यांनाही काहींचा विरोध आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीची उत्कंठा वाढत जाणार आहे. मनपा निवडणुकीवरून माजी खासदार नरेश पुगलिया व शहर कॉंग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर यांच्यात वाद झाला होता, परंतु आता पुगलिया-नागरकर यांनी कॉंग्रेसचा महापौर बसविण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे चित्र निर्माण केले आहे. या दोन्ही नेत्यांच्या झालेल्या बैठकीला सर्व नगरसेवकांसह कालपर्यंत रामू तिवारी यांच्यासोबत असलेल्या महापौर संगीता अमृतकरही उपस्थित होत्या. त्यांना पुन्हा महापौरपद हवे आहे. तिकडे काही अपक्ष नगरसेवक तीर्थाटनाला निघून गेले, तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवकही कॉंग्रेससोबत आहेत. त्यामुळे महापौरपदावर लक्ष ठेवून असलेले मन्ना महाराज त्रिवेदी यांच्या पत्नी संगीता त्रिवेदी यांचा  स्वप्नभंग होण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व बाजूंनी विचार केला तर भाजपचे संख्याबळ नसले तरी महापौर भाजपचाच होईल, अशीच एकंदरीत स्थिती आहे. महापौरपदाच्या खुर्चीत आपलीच पत्नी विराजमान व्हावी, यासाठी संजय कंचर्लावार, वीरेंद्र लोढीया, मन्ना त्रिवेदी व गोपाल अमृतकर हे नवरोबा कामाला लागल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.