केंद्रात व राज्यात सत्तास्थानी आल्यानंतर भाजपमध्ये सर्व पातळ्यांवर नव्या-जुन्यांचा वाद रंगल्याचे पहावयास मिळते. परंतु, हे वाद आता पक्षात नव्याने स्थिरावलेल्यांमध्ये झडू लागले आहेत. धुळे जिल्ह्यात  संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण हे त्याचे उदाहरण. आतापर्यंत शीतयुध्दाच्या स्वरुपात चाललेल्या वादाने वेगळे वळण घेतले. संरक्षण राज्यमंत्री विरोधकांशी हातमिळवणी करीत शहराच्या विकासात आडकाठी करीत असल्याची तोफ गोटे यांनी डागली आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. या आरोपांना धुळ्याचे खासदार असलेल्या भामरे यांनी प्रत्युत्तर दिले नाही.

धुळे शहरातील राजकीय पटलावर आमदार गोटेंविरोधात सहजासहजी विरोधक तोंड उघडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे हे त्यांचे हाडवैरी.  विरोधक हिम्मत दाखवत नसल्याने गोटे यांचा वारू चौफेर उधळू लागला. त्यांच्या आरोपांच्या तावडीत आता स्वपक्षीय केंद्रीयमंत्री सापडले आहेत. डॉ. भामरे काय आणि गोटे काय, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी भाजपकडून निवडणूक लढविली. पुढील काळात विकास कामांच्या श्रेयावरून त्यांच्यात लढाई जुंपली. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाबाबत गोटे यांनी केलेल्या प्रयत्नांवर जणू नाकर्तेपणाची मोहोर उमटविण्यासाठी डॉ. भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या रेल्वे मार्गाबाबत आजवर कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दाखले देत त्यांनी आपण काय प्रयत्न केले याची सविस्तर माहिती कथन केली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची चित्रफीत दाखवून आपणच या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास देण्याचा प्रयत्न भामरे यांनी केला. ही गोष्ट उभयतांमध्ये मतभेदांची ठिणगी पडण्यास कारक ठरली. कारण, रेल्वे मार्गासाठी प्रदीर्घ काळापासून आंदोलन ते पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केल्याचा गोटे यांचा दावा आहे.

मुळात शहरातील राजकारण दशभरापासून आमदार गोटे विरुद्ध माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यात सीमित राहिले. गोटे यांनी स्वत: स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षा ऐवजी भाजपची उमेदवारी मिळविली आणि भाजप गोटातील निष्ठावंतांची पंचाईत झाली. संख्याबळ वाढवायचे असल्याने निष्ठावंतांनी निमूटपणे हे सहन केले. गोटे हे तिसऱ्यांदा कदमबांडेंचा पराभव करून विधान सभेत पोहोचले. त्यांच्या सलग विजयामागे शहरवासीयांशी नाळ ठेवल्याचा दावा केला जात असला तरी तो केवळ राजकीय मुत्सदेगिरीचा भाग ठरतो. उलट ज्या वेळी आपल्या फायद्यासाठी राजकीय भांडवल करण्याची वेळ येते, त्या वेळी गोटेंनी विरोधकांवर सनसनाटी आरोप करत तोंडसुख घेतल्याचा इतिहास आहे. अलीकडेच संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्याविरोधात भाष्य करून गोटे यांनी राजकीय धुराळा उडवला. स्वपक्षीय मंडळी आपल्यामार्फत केल्या जाणाऱ्या विकास कामांना कशा पद्धतीने विरोध करते हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अतिशय शेलक्या शब्दांचा वापर केला.

गोटे यांनी साकारलेली अनेक कामे बेकायदेशीर असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्या अंतर्गत पांझरा चौपाटी जमीनदोस्त करण्यात आली. विरोधकांनी ही चौपाटी तोडली असे राजकीय भांडवल करण्यास गोटे मागे नाहीत. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळेच एका बाजूला आणि गोटे हे दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. गोटे यांच्या आक्षेपांबाबत भामरे यांनी मौन बाळगले आहे. थेट मंत्र्यावर शरसंधान साधल्याने भविष्यात भाजपची उमेदवारी मिळणार नसेल तर आपण कोणत्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याची चाचपणी गोटे यांनी सुरू केली आहे.