नांदेड-वाघाळा मनपा निवडणूक

मुंबईत १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने पं. दीनदयाल यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्त्वज्ञानाला तिलांजली दिली. भाजपही इतर पक्षांप्रमाणे एक सत्तापिपासू पक्ष म्हणून उदयास आला, अशा शब्दात नानाजी देशमुख यांनी या पक्षाला खडे बोल सुनावले होते. नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा एकंदर कारभार पाहिल्यानंतर  नानाजींनी वर्णिलेली सत्तालोलूप वृत्ती ठळकपणे समोर आली आहे.

मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपल्यानंतर भाजपच्या स्थानिक शाखेने सायंकाळी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीचे एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे, मनपा निवडणुकीच्या दोन दशकाच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच नांदेडच्या सर्व जागांसाठी उमेदवार देणे शक्य झाले, पण बहुतांश वृत्तपत्रांनी भाजप उमेदवार यादीचे वर्णन ‘आयारामांना संधी, त्यांची चलती किंवा नव्यांना वाव’ अशा पद्धतीने केले असून दोन्ही प्रभारी व काँग्रेसी परंपरेतील आताच्या भाजप नेत्यांनी पक्षाच्या मूळ तत्त्वांचे गोदावरी पात्रात विसर्जन करून जो प्रयोग केला, त्यामुळे पक्षाच्या विचारधारेतून घडलेल्या कार्यकर्त्यांना व्यथीत करून टाकले.

पक्षाने नांदेडमध्ये परिवर्तनाचा नारा दिला आहे. तो स्वागतार्ह मानला जात असला तरी स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांत घराणेशाहीचे झेंडे रोवताना पक्षात नव्याने आलेल्यांचेही ‘पुनर्वसन पर्व’ सुरू केल्यामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी पुढे येण्यास वाव मिळाला नाही. ज्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला, त्यांना कढीपत्त्यासारखे बाजूला काढण्यात आले. धनश्री देव यांच्या प्रभागात १५ दिवसांपूर्वी आलेल्या एका महिलेला तिकीट देण्यात आले. तर केवळ १५ तासांपूर्वी भाजपत आलेल्या संतोष मानधने यांना शिवाजीनगरसारख्या महत्त्वाच्या प्रभागातील सर्वसाधारण जागेची उमेदवारी देण्यात आली. मागील एक-दीड महिन्यापासून भाजपत मोठय़ा प्रमाणावर इनकिमग सुरू होते. त्यातील संदीप चिखलीकर यांच्यापासून बाळू खोमणे यांच्यापर्यंत सर्वानाच उमेदवारीने पावन करून घेण्यात आले. भाजपच्या संपूर्ण यादीवर नजर टाकल्यानंतर जुन्यांपकी अरुंधती पुरंदरे, माजी नगरसेवक नंदू कुलकर्णी यांची पत्नी वनमाला, प्रभा व्यंकटेश साठे अशी मोजकीच नावे समोर येतात. पक्षाचे माजी नगरसेवक सुनील नेरलकर महिनाभरापूर्वी पुन्हा स्वगृही आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्या आपल्या पुतण्याच्या उमेदवारीचे भाजपत फिक्सिंग केले. अलीकडच्या काही वर्षांत पक्षात काम करणाऱ्यांपकी मोजक्यांनाच संधी देण्यात आली. भाजप उमेदवारांच्या यादीवर या दीड-दोन महिन्यात प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून पक्षात आलेल्यांचाच वरचष्मा आहे.

तेव्हा सप्ततारांकित हॉटेल; आता मंगल कार्यालय

नानाजी देशमुख यांनी २००६ मध्ये विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र पाठविले होते. त्यात २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने मुंबईत एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये घेतलेल्या बठकीचा उल्लेख करून पक्षाकडे एवढा पसा आला कोठून, असा टोकदार सवाल केला होता. आता मनपाच्या निवडणुकीसाठी या पक्षाने तब्बल १० लाख रुपये भाडं भरून एक सुसज्ज वातानुकूलित मंगल कार्यालय एक महिन्यासाठी आरक्षित केले असून तेथूनच पक्षाची रणनीती आखण्यात येत आहे.