गडचिरोली जिल्हय़ातील सूरजागड, दमकोंडवाही, बांडे, आगरी-मसेली, झंडेपार, पुसेर या लोह खाणींना ४० देशांतील ७० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आंतरराष्ट्रीय समर्थन पत्रावर या सर्व संघटनांनी स्वाक्षरी केल्या आहेत. विस्थापन विरोधी जन विकास आंदोलनाचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी यांनी सूरजागड प्रश्न ‘युनायटेड नेशन्स’मध्ये चर्चेत आणल्यापासून या सर्व संघटनांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे.

एटापल्ली तालुक्यात सूरजागड येथे लोह खाण उत्खनन लॉयड मेटल्स उद्योग समूहाच्या वतीने केले जात आहे. या खाणीला स्थानिक आदिवासींनी तीव्र विरोध केला. ठाकूरदेव यात्रेच्या माध्यमातून ग्रामसभांनी एकत्र येत हा प्रकल्प होऊ नये यासाठी आवाज बुदंल केला. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी ८३ ट्रकांची जाळपोळ करून सूरजागड नको असे म्हणून विद्रोहाची घोषणा केली. तरीही हा प्रकल्प येथे होऊ घातला आहे. केवळ सूरजागडच नाही तर कोरची तालुक्यातील कमकोंडवाही, बांडे, आगरी-मसेली, झंडेपार, पुसेर या प्रकल्पांनाही विरोध सुरू झाला आहे. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या प्रकल्पाचे डॉ. शुभदा देशमुख व डॉ. सतीश गोगुलवार यांनी विरोध दर्शविला.

जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी यांनी तर सूरजागडला स्थानिक पातळीवर विरोध करतांनाच हा प्रश्न ‘युएन’मध्ये चर्चेत आणला. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. विस्थापन विरोधी जन विकास आंदोलन समितीने येथे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात ४० देशांतील ७० आंतरराष्ट्रीय संघटनांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवित पत्रावर स्वाक्षरी केल्याचे म्हटले आहे.

यामध्ये ब्राजील, दक्षिण आफ्रिका, झाम्बिया, टुनीशिया, मॉरिशस, संयुक्त राष्ट्रे अमेरिका, तंजानिया, बांगलादेश, वेनेजुएला, अल्जेरिया, इक्वाडार, चिली, अर्जेटीना, पेरू, युनाईटेड किंगडम, पोर्तेरिको, स्वीडन, पीलिस्तिन, मॅक्सिको, रोद्रीगुए, आर्यलड, क्युबा, कनाडा, जर्मनी, पारागुए, अर्बेनिया, हैती, कुर्दिस्तान, झिम्बाबे, केनिया, मोरोक्को, घाना, नेपाल, नायजेरिया, श्रीलंका, बुकिंना फ्रासो, पाकिस्तान, सेनेगल, त्रिनिदान अंड टोबैगो आदी देशांतील या ७० संघटना आहेत. यासोबतच धानोरा, चामोर्शी, भामरागड या तालुक्यातील प्रस्तावित खाणींनाही विरोध दर्शविण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे खाण जनसुनावनीला विरोध दर्शविण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या विरोधामुळे आदिवासींच्या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. सूरजागड बंद करावे, अशी मागणी वारंवार होत असतांनाही राज्य व केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

विरोधानंतरही सर्वेक्षण

४० देशांतील ७० आंतरराष्ट्रीय संघटनांनी सूरजागड प्रकल्पाला विरोध दर्शविला असला तरी लॉयड मेटल कंपनीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. कडक पोलिस बंदोबस्तात कंपनीचे अधिकारी हे सर्वेक्षण करत आहेत. याचाच अर्थ पावसाळय़ात लॉयड कंपनीने काम बंद ठेवले होते. आता कंपनीला पुन्हा काम सुरू करायचे आहे. त्यामुळेच हे सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.