जागतिक मराठी अकादमी आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान यांच्या वतीने येथे पाच व सहा जानेवारी रोजी दहावे ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे भूषवणार आहेत. गोवारीकर यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, राज ठाकरे, दिग्दर्शक जब्बार पटेल, सिडनी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष शरद पाठक, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशिष चौघुले आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता गोवारीकर आणि २.३० वाजता राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता ‘समुद्रापलीकडे भाग एक’ मध्ये ऑस्ट्रेलियातील शरद पाठक, दुबईतील अशोक कोरगावकर, चीनमधील सुभाष दामले आणि अमेरिकेतील गजानन सबनीस हे मान्यवर मराठी तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता डॉ. उदय निरगुडकर यांची ‘यशस्वीतेची परिभाषा’ या विषयावर मुलाखत होईल. रात्री आठ वाजता दिल्लीतील सार्वजनिक उत्सव समितीच्या सहकार्याने ‘चित्र-शिल्प-काव्य’ यावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
रविवारी सकाळी १० वाजता ‘मुक्काम पोस्ट नाशिक’ या कार्यक्रमांतर्गत देश व परदेशात कर्तृत्व गाजविणारे रवींद्र सपकाळ, शशिकांत जाधव, कविता राऊत, राजीव पाटील, डॉ. पंकज कोईनकर (जपान) हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत; तर दुपारी १२ वाजता ‘समुद्रापलीकडे भाग दोन’ मध्ये अनिल नेरुळकर (अमेरिका), निरुपमा सोनाळकर (जर्मनी), सुजिता राणे (ऑस्ट्रेलिया) हे मार्गदर्शन करतील. दुपारी अडीच वाजता मीरा उमप यांची मुलाखत घेण्यात येईल. तसेच सायंकाळी चार वाजता ‘शतक चित्रपटसृष्टीचे’ या विषयावर विजय कोंडके व जब्बार पटेल चर्चेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, अमेरिकेतील उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे असून संमेलनाचे खजिनदार म्हणून अद्वय हिरे हे काम पाहत आहेत. संमेलनास नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष आ. डॉ. अपूर्व हिरे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत हिरे यांनी केले आहे.