गंगाखेड मतदारसंघातील विद्यमान आमदार घनदाट मुंबईत राहतात. त्यांनी कार्यकाळात सभागृहात कधीही तोंड उघडले नाही. रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे परळीचे आहेत. ग्रामीण भागातून आलेले उद्योजक म्हणून त्यांना आम्ही मदत केली. पण त्यांनीही पुढे राष्ट्रवादीशी संबंध ठेवला नाही. घनदाट व गुट्टे या दोघांनाही पसेवाटप प्रकरणात अटक झाली. या उमेदवारांचा लोकप्रतिनिधी म्हणून कदापिही विचार करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गंगाखेडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या प्रचारानिमित्त पूर्णा येथील मेंढा बाजारात पवार यांची सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी खासदार गणेश दुधगावकर होते. माजी खासदार अॅड. सुरेश जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष विशाल कदम आदी उपस्थित होते. आपल्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या विरोधकांचे हातसुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. मोदी सरकारमधील १३ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हयातीत गोपीनाथ मुंडे यांना भाजप नेत्यांनी त्रास दिला. मुंडेच्या अंत्यसंस्कारास येण्यास वेळ नव्हता, तेच मोदी आता मात्र महाराष्ट्रात सभा घेत फिरत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.
केंद्रे यांनी, घनदाट यांनी अर्ज भरून ३०० गावांत पसेवाटप केल्याचा आरोप केला. आमदारांनी मतदारसंघातील गावांना भेटीही दिल्या नाहीत, म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन केले. अॅड. सुरेश जाधव, माजी खासदार दुधगावकर, सारंगधर महाराज यांचीही भाषणे झाली.