नोटाबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांमध्ये जुन्या नोटा जमा होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर आयकर विभागाने आपला मोर्चा आता अशा संस्थानांकडे वळवला आहे. शिर्डीतील साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थानाला नोटीस बजावल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

आयकर विभागाने शिर्डी आणि पंढरपूर संस्थानला नोटीस बजावली आहे. दोन्ही संस्थांनानी ९ नोव्हेंबरनंतरच्या पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांचा तपशील जाहीर करावा असे नोटीशीत म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिर्डीमधील दानपेटीत आत्तापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांच्या पाचशेच्या जुन्या नोटा आणि ३ लाख रुपयांच्या एक हजारच्या जुन्या नोटा आढळल्या आहेत. तर पंढरपूरमधील मंदिरातही हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांचे प्रमाणही वाढले होते. नोटाबंदीनंतर पंढरपूरमध्ये नेहमीच्या तुलनेत एक हजार रुपयांच्या नोटांमध्ये ३० टक्क्यांनी तर पाचशेच्या नोटांमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंढरपूरमध्ये यापूर्वी पाचशे आणि हजारच्या नोटांपेक्षा १००, ५० आणि १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण जास्त होते. जुन्या नोटा खपवण्यासाठी भाविकांनी थेट दानपेटीत या नोटा जमा केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा आता चलनातून बाद झाल्या आहेत. देशभरातील बँकांमध्ये आत्तापर्यंत ८ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. तर दुसरीकडे देशभरातील धार्मिक स्थळांमध्येही जुन्या नोटा दान करण्याचे प्रकार वाढले आहेत.