साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत प्रकाशकांनी उतरावे किंवा मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे हे योग्यच नाही. आता प्रकाशकही साहित्यिक होऊ लागले आहेत, अशी टीका ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी आज येथे केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी नागपुरात अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. साहित्य म्हणजे, ग्रंथ आणि हे ग्रंथ जगासमोर आणण्याचे काम प्रकाशक करीत असल्यामुळे त्यांचे अनेक लेखकांशी आणि साहित्यक्षेत्रात संबंध असतात आणि हे मतदार आपल्याला सोडून दुसऱ्यांना मतदान करणार नाही, या मानसिकतेतून तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही त्यांची भूमिका पटत नाही. प्रकाशक बाबा भांड यांच्यावर आरोप असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी त्यांची नियुक्ती राज्य सरकारने केली असल्यामुळे त्यांनीच हा विचार करायला हवा होता. असे असले तरी निकोप साहित्य निर्मितीवर परिणाम होऊ नये, अशी माझी भूमिका असून त्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे विठ्ठल वाघ म्हणाले.
मोठय़ा प्रमाणात शेतकरी खचलेला असून त्यांचे दुख समाजासमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात ते होत नाही. शेतकऱ्यांचे बाह्य़चित्रण न करता त्या विषयांच्या खोलीतून ते होणे व या प्रश्नांवर केवळ लेखन न करता साहित्यिकांनी कृतीशील होण्याची गरज आहे. केवळ अभिनेते आणि सामाजिक संस्था काम करीत असल्या तरी सामान्य माणसांनी शेतक ऱ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील होऊन समोर आले पाहिजे. शेतक ऱ्यांच्या अनेक आंदोलनात सहभागी झालेलो आहे. कार व फ्रिजचे भाव वाढले तर आपण ओरडत नाही आणि काद्यांचे भाव वाढले तर मात्र ओरडतो. या भाववाढीला दलाल आणि व्यापारी दोषी असतात, असे ते म्हणाले. इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे मराठीला अवकळा आली आहे. इंग्रजी भाषेला विरोध नाही. मात्र, मराठी भाषेचा शब्दसंग्रह वाढविला पाहिजे. उपेक्षित असलेल्या बोलीभाषेचे कोष तयार केले पाहिजे. २० हजार शब्दांचा कोष तयार करण्यात आला आहे. बोलीभाषेचे संवर्धन केले नाही, तर या भाषा संपुष्टात येतील. त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लक्ष वेधले गेले पाहिजे, असेही वाघ म्हणाले.

.. ही तर विवेकाचीच हत्या
दाभोळकर, पानसरे आणि त्यानंतर आता पुरोगामी कन्नड विचारवंत एम.एम, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. ही विवेकाची हत्या होत आहे. सामान्य माणसांचा श्रद्धेच्या भावनेचे शोषण करून धर्माच्या नावावर जी दुकानदारी सुरू आहे त्याला भाबडी माणसे समोर जात आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून कार्य करणारे विचारवंत त्याला विरोध करीत असताना त्यांची हत्या केली जात आहे. ही विवेकाचीच हत्या आहे. पूर्वी हा प्रकार होता आणि आजही होत आहे. पुढे होऊ नये यासाठी विचारवंतानी आणि साहित्यिकांनी समोर येण्याची गरज आहे.

मोरेंचे विधान अयोग्य
औरंगाबादचे नामकरण करताना धार्मिक तेढ निर्माण होऊ द्यायची नसेल तर सर्वधर्माच्या साहित्याचा अभ्यास करणारा, औरंगजेबचा भाऊ दाराशुकाहो यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी केली आहे. त्यावर बोलताना विठ्ठल वाघ म्हणाले, मोरे यांच्या विधानातून हा नवा वाद झाला असताना तो कसा मिटेल, हा प्रश्न आहे. तो मिटला तर आनंद होईल. औरंगजेब हा मुस्लिम होता, तर त्याचा भाऊ मुस्लिम राहणार आहे. जे नाव न देण्यासाठी हा सर्व वाद सुरू आहे. त्यावर मोरे यांनी विधान करणे योग्य नसल्याचे मत वाघ यांनी व्यक्त केले.