गुळाला ३ हजार ६०० रुपये िक्वटल आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी १२ दिवस गुऱ्हाळ घरे बंद ठेवण्याचा व बुधवारी (दि. १७ ) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. गूळ उत्पादक शेतकऱ्यांची परवड यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी आधारभूत किमतीसाठी शासनाशी जोरदार संघर्ष करण्याचा इशारा यावेळी दिला.
यंदाच्या हंगामात गूळ उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसात गुळाचा दर कमालीचा खालावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ३ दिवसांपूर्वी मार्केट कमिटीत झालेल्या गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात शासनाने आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली होती. शासनाने जाहीर न केल्यास रविवारी मेळावा घेऊन शेतकरीच गुळाची आधारभूत किंमत जाहीर करतील, असे एन. डी. पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आजच्या मेळाव्यात गुळाची आधारभूत किंमत किती ठरवली जाणार आणि आंदोलनाची दिशा कोणती असणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते.
मेळाव्यात गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. व्यापाऱ्यांकडून दर पाडला जात असल्याचा आरोप करण्यात आला. गुळाचे साठे पडून राहिले असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना कसे सामोरे जावे लागत आहे, याविषयी मते मांडली. आधारभूत किंमत मिळाल्याशिवाय गूळ उत्पादक शेतकरी तगणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. सर्वाच्या विचारांती वरीलप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.