प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेशी असलेले मतभेद चर्चेने सोडवण्यात येतील, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
गणपतीपुळे देवस्थानतर्फे बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, जैतापूर प्रकल्पाच्या मुद्दय़ावर भाजप आणि शिवसेनेमध्ये तात्त्विक मतभेद आहेत. पण शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे या विषयाबाबत त्यांच्याशी असलेले मतभेद मिटवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची या विषयावर चर्चा सुरू आहे. त्यातून निश्चितपणे तोडगा निघेल, असा विश्वास आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या संचालकांविरुद्ध चौकशीच्या कारवाईबाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, त्याबाबत कोणताही भेदाभेद न करता कायद्यानुसार जे करावे लागेल ते करण्यात येईल.  यंदाच्या मोसमात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने आणि बागायतदारांच्या शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. त्याबाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, बागायतदारांना बसलेल्या आर्थिक फटक्याची कल्पना मला आली आहे. उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत काही कार्यक्रमांसाठी मी आहे. त्या वेळी मुख्यमंत्र्यांशी या गंभीर परिस्थितीबाबत निश्चितपणे चर्चा करेन आणि आंबा बागायतदारांना समाधानकारक भरपाईसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.
कोकणात पर्यटनासाठी ताकद देऊ!
दरम्यान भक्तनिवासाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांनी कोकणात पर्यटनाचा विकास केल्यास पर्यावरणपूरक विकास होऊ शकेल, अशी सूचना केली. तो धागा पकडून मुनगंटीवार म्हणाले की, येथील नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून पर्यटन क्षेत्राचा विकास केला तर कोकण हे जागतिक  पातळीवरील पर्यटन केंद्र होऊ शकेल. कोकणच्या शाश्वत विकासासाठी तो सर्वात प्रभाव पर्याय आहे. म्हणून येथे पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने शासनातर्फे निधी कमी पडू दिला जाणार नाही.  गणपतीपुळे देवस्थान संस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत केले. शृंगेरी पीठाचे जगतगुरू श्री शंकराचार्य यांचे प्रतिनिधी पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.