जिल्ह्य़ात पाचही जागा लढविणाऱ्या काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. जिल्ह्य़ातील ९ लाख ६० हजार ६५३ पैकी १ लाख ८ हजार २३० मते मिळवून हा पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला. या पक्षाला मिळालेल्या ११.२६ टक्के मतांमध्ये महत्त्वाचा वाटा परतूर व जालना मतदारसंघाचा राहिला. उर्वरित ३ मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
पूर्वी विधान परिषद सदस्य व २००९ मध्ये अपक्ष म्हणून परतूरमधून विधानसभेवर निवडून गेलेले सुरेश जेथलिया या वेळी काँग्रेसकडून उभे होते. मात्र, ४ हजार ३०० मतांनी त्यांचा पराभव झाला. ऐन वेळी राष्ट्रवादीकडून उतरलेल्या राजेश सरकटे यांना ४ हजार ७५८ (२.५३ टक्के) मते मिळाल्याने त्यांना दलित-मुस्लिमांची मते मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु असे होऊनही जेथलियांचा पराभव झाला. मनसे उमेदवार बाबासाहेब आकात (३७ हजार २०८) यांना मिळालेल्या मतांचा फटका काँग्रेसला बसला. मतदानाच्या दोन दिवस आधी काँग्रेसनिष्ठ म्हणवली जाणारी काही मंडळी भाजपचे उमेदवार लोणीकर यांच्या बाजूने वळल्याने जेथलियांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला.
जालना मतदारसंघात बसपचे उमेदवार अब्दुल रशीद यांनी घेतलेली २०.४३ टक्के मते काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांच्या मार्गात अडथळा आणणारी ठरली. त्यातच मागील निवडणुकीत काँग्रेससोबत असणारे अरविंद चव्हाण या वेळी भाजपकडून उभे होते. मतदानातील २१.१२ टक्के मते त्यांनी घेतली. परिणामी शिवसेनेचे अर्जुन खोतकर सलग चौथ्यांदा येथून निवडून आले.
भोकरदनमध्ये काँग्रेस उमेदवार सुरेश गवळी यांना ५ हजार २१३ (२.६८ टक्के), तर घनसावंगीत काँग्रेस उमेदवार डॉ. संजय लाखे-पाटील यांना २ हजार ७६२ (१.२९ टक्के) मते मिळाली. ऐन वेळी राष्ट्रवादीचा त्यागकरून बदनापूरमध्ये काँग्रेसकडून उभे राहिलेल्या सुभाष मगरे यांना १३ हजार ७ (६.९३ टक्के) मतदान झाले. २००४ मध्ये जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकही विधानसभा सदस्य नव्हता. याचीच पुनरावृत्ती या वेळेस झाली. मागील ६ निवडणुकांमधून काँग्रेसने जिल्ह्य़ात १५ उमेदवार उभे केले. पैकी ४ विजयी झाले. गेल्या सहाही लोकसभा निवडणुकांत जालना मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला.