जालना येथील जिल्हा हिवताप कार्यालयाचे अधीक्षक सिंदखेडकर यांना अर्जित रजा मंजूर करून घेण्यासाठी लाच घेताना हातोहात पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चार हजाराची लाच घेताना पकडले. भोकरदन तालुक्यातील आन्वा इथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजा मंजूर करून हवी होती. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची शिफारस घेऊन जालना जिल्हा हिवताप कार्यालय अधीक्षक यांच्याकडे रजेचा अर्ज करण्यात आला होता.

जिल्हा हिवताप अधिकाऱ्याकडून रजा मंजूर करून देतो. मात्र अर्जित रजा उपभोगल्यानंतर पाच हजार रुपये मोबदला म्हणून द्यावा लागेल, अशी मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केली असता अर्जित रजा मंजूर करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले. जिल्हा कार्यालयात सापळा सापळा रचून सिंदखेडकर यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आलो. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.