जालना बाजार समिती निवडणूक
येत्या १५ मे रोजी होणाऱ्या जालना बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने पॅनेल उभे केले आहे. काँग्रेसच्या पॅनेलमध्ये शेतकरी संघटना (शरद जोशी प्रणीत) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचाही समावेश आहे.
समितीचे सभापती आमदार अर्जुनराव खोतकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या विरोधातील काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व माजी आमदार कैलास गोरंटय़ाल यांच्याकडे आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघ आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील १५ जागांवर शिवसेनेचे सात, भाजपचे पाच आणि राष्ट्रवादीचे तीन उमेदवार उभे आहेत. खासदार दानवे यांचे बंधू भास्करराव प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत.
आमदार खोतकर समितीचे सभापती असून या वेळेसही उभे आहेत. १९९४पासून संचालक असणारे विष्णू पवार या वेळेस चौथ्यांदा उभे आहेत. बाबूराव पवार यापूर्वी दोन वळेस संचालकपदी निवडून आले. आता तिसऱ्यांदा ते उभे आहेत. भाऊसाहेब घुगे दुसऱ्यांदा मैदानात आहेत.
वसंत जगताप, कमलाकर कळकुंबे, सुभाष बोडखे, तुळशीराम काळे, संगीता चंद, तारामती गोटे, मीरा बावणे, श्रीकांत घुले, बाबा मोरे, काजळकर हे उमेदवार आमदार खोतकर यांच्या पॅनेलमधून उभे आहेत. राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी या पॅनेलमध्ये जे ३ उमेदवार दिले आहेत, त्यापैकी दोन जालना तालुक्यातील त्यांच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील गावांमधील आहेत. गोरंटय़ाल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पॅनेलमध्ये शेतकरी संघटनेचे डॉ. अप्पासाहेब कदम, तसेच मनसेचे अंकुश पाचफुले उमेदवार आहेत. स्वत: गोरंटय़ाल निवडणूक लढवत आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघातील गोरंटय़ाल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे – कैलास उबाळे, विजय कठाळे, शिवाजी दाभाडे, देवेंद्र देशमुख, श्रीराम जोशी, गंगुबाई पोहेकर, योगिता कतारे, द्वारकाबाई खरात, अंजाभाऊ चव्हाण, आशाबाई डुकरे, कमल मदन, रुक्मिणी लोखंडे. व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी अनिल सोनी आणि रमेश तोतला या दोन विद्यमान संचालकांसह सात उमेदवार उभे आहेत. हमाल-मापाडी मतदारसंघातील एका जागेसाठी विद्यमान संचालक गोपाळ काबलिये पुन्हा उभे आहेत.
१ जून २०००पासून आतापर्यंत म्हणजे गेली १६ वर्षे बाजार समितीवर शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व आहे. १ जून २००० ते १२ ऑगस्ट २००७ दरम्यान शिवसेनेचे दिवंगत आमदार नारायणराव चव्हाण सभापती होते. १३ ऑगस्ट २००७पासून आतापर्यंत शिवसेनेचे आमदार खोतकर सभापती आहेत.

महत्त्वाची निवडणूक
राज्यातील ३०३ बाजार समित्यांमध्ये उलाढालीत पहिल्या दहामध्ये जालना बाजार समितीचा समावेश आहे. १९३१मध्ये अस्तित्वात आलेली ही बाजार समिती राज्याच्या बाहेरही प्रसिद्ध आहे. कापूस, अन्नधान्य, गळीत धान्य, गूळ आदींच्या उलाढालीसाठी राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीस जिल्ह्य़ातील राजकारणात मोठे महत्त्व असते.